भाजप नेता म्हणाला, ‘पेट्रोलचे दर दोनशेवर गेल्यास ‘ट्रिपलसीट’ला मान्यता’ | पुढारी

भाजप नेता म्हणाला, ‘पेट्रोलचे दर दोनशेवर गेल्यास 'ट्रिपलसीट'ला मान्यता’

मुंबई, पुढारी ऑनलाईन

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता त्यात तेल ओतण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. पेट्रोलचे दर २०० रुपयांवर गेले तर दुचाकीवर ‘ट्रिपलसीट’ जाण्यास कायदेशीर मान्यता देण्यात येईल, अशी घोषणाच भाजपच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

ही घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांना संताप आणणारी ही घोषणा आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष भावेश कालिता यांनी केली आहे.

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या महिन्यात १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सध्याचे इंधन हे विमानाच्या इंधनापेक्षाही महाग विकले जात आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे झळ बसत असताना बेताल वक्तव्ये करून भाजपचे नेते आणखी संताप वाढवत आहेत.

आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांनी भाषण करताना इंधन दरवाढीचे समर्थन केले. ‘पेट्रोलचा दर प्रतिलिटर 200 रुपयांजवळ पोहोचल्यास राज्यात दुचाकीवर ट्रिपलसीट जाण्यास आसाम सरकार परवानगी देणार आहे. दुचाकीवर तिघे बसू शकतील, अशा दुचाकींचे उत्पादनही घेण्याबाबतही सूचना केली जाईल. लोक इंधन बचतीसाठी लक्झरी कार चालवण्याऐवजी एकाच दुचाकीवर तिघे बसून जाण्यास प्राधान्य देतात, असा शोधही त्यांनी लावला.

पेट्रोलचे दर : वक्तव्यावर संताप

कलिता यांनी केलेल्या विधानाचे पडसाद उमटत असून दुचाकीवर ट्रिपल सीट अधिकृतपणे जाण्यास परवानगी देण्याची सरकारी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. यासाठी पेट्रोल- डिझेल दरवाढीचे समर्थन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमानाचे इंधन प्रतिलिटर ७९ रुपये २० पैसे आहे.

दरकपात नाहीच

देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल चे दर कधी कमी होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र या इंधनांच्या किमतीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी दिले आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button