नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार | पुढारी

नाशिक : दोन हजारांच्या नोटा बंद झाल्याने प्रेस कामगारांचे पगार वाढणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांचे मूल्य असणाऱ्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्याचप्रमाणे येत्या 30 सप्टेंबर नंतर या नोटा चलनात राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय काहींसाठी त्रासदायक असला तरी येथील प्रेस कामगारांना मात्र आर्थिक हिताचा व पगारवाढ देणारा ठरणार आहे. त्यामुळे प्रेस कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दोन हजाराची नोट बंद होणार असल्याने दहा पासून पाचशे पर्यंतच्या नोटांना बाजारात जास्त मागणी येणार आहे. त्यामुळे नाशिकरोड प्रेसला रिझर्व्ह बॅंकेकडून जादा काम मिळून प्रेस कामगाराचा फायदाच होणार आहे. दरम्यान, कितीही मोठे काम मिळाले तरी आमचे प्रेस कामगार नेहमीप्रमाणे ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सज्ज असल्याची प्रतिक्रिया प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली. मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे व एक हजाराची नोट चलनातून बाद करून दोन हजाराची नोट चलनात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. काळा पैसा बाहेर काढण्याचा निर्णय यशस्वी झाल्याचा दावा सरकारने केला. मात्र, दोन हजाराच्या नोटा व्यवहारात वापरणे पहिल्यापासून अडचणीचे ठरू लागले होते. रिझर्व्ह बॅंकेनेही तसा अहवाल सरकारला दिला होता. त्यामुळे दोन हजाराची नोट छपाई बंद करण्याचा निर्णय आता घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी दोन हजाराच्या नोटांची छपाई ही २०१७-१८ पासूनच बंद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने दोन हजाराच्या नोटा परत स्वीकारण्याची प्रक्रिया अगोदरच सुरु केली आहे. रिझर्व्ह बॅंक नाशिकरोड आणि देवास प्रेसकडून नोटा छापून घेत असते. मात्र, बॅंकेने सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) येथे स्वतःची नोट प्रेस सुरु करुन नाशिकरोड प्रेसशी स्पर्धा सुरु केली. दोन हजाराच्या नोटा बॅंकेच्या स्वतःच्या प्रेसमध्ये छापण्यात येत होत्या. नाशिकरोड प्रेसला पाच रुपया पासून पाचशे पर्यंतच्या नोटा छपाईचे काम देण्यात आले आहे. हे काम हजार कोटींचे नव्हे तर अब्जावधींचे आहे. नाशिकरोड प्रेसला या वर्षी ५ हजार दोनशे दशलक्ष नोटा छापण्याचे काम मिळाले आहे. याशिवाय नेपाळच्या तीनशे कोटी नोटा छपाईचे काम मिळाले असून अन्य देशांच्या नोटा छपाईला मिळाव्यात यासाठी प्रेस प्रशासन व कामगार नेते सरकारकडे प्रयत्न करत आहेत.

प्रेसला आर्थिक लाभ चौकट
जनतेला, व्यावसायिकांना दोन हजाराची नोट चलनात व्यवहार्य वाटत नाही आणि वाटलीही नाही. त्यांनी पाच पासून पाचशेपर्यंतच्या नोटांनाच कायम प्राधान्य दिले आहे. दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे नाशिकरोड प्रेसला फायदा होणार आहे. सध्या या प्रेसमध्ये दहापासून पाचशे रुपयापर्यंतच्या नोटा छापण्याचे काम वेगात सुरु आहे. त्यात आता परदेशी आधुनिक मशिनरी लावण्यात आल्याने छपाईचा वेग वाढला आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात नाशिकरोड प्रेसला सुमारे तीनशे कोटींचा नफा झाला आहे. आता दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे नाशिकरोड प्रेसला नोट छपाईचे आणखी काम मिळणार आहे. त्यामुळे रोजगारवृध्दी होणार आहे. नफा वाढल्याने कामगारांना जादा बोनस मिळणार आहे. या सर्वांचा परिणाम नाशिकरोडच नव्हे तर नाशिकच्या अर्थचक्राला होणार आहे. उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. नाशिकरोड प्रेस आपल्या नफ्यातून मोठ्या प्रमाणात सामाजिकी निधी समाजाला, भूकंप, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तंना देत असते. आता नफा वाढणार असल्याने हा निधीही वाढून समाजाला फायदाच होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button