बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे: अजित पवार  | पुढारी

बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे: अजित पवार 

बारामती: पुढारी वृत्तसेवा: महागाई कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी, म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे.  बटन दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्किल शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
बारामती येथे आज (दि.२१) ज्येष्ठ नागरिक निवास  येथील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्ष  इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, येथील एका कक्षाचे बांधकाम ५० हजारात पूर्वी झाले होते. मात्र त्याच्या नुतनीकरणासाठी ३ लाख रूपये खर्च आला. महागाई कशी वाढत चालली आहे. हे तुमच्या लक्षात रहावे, यासाठी मी सांगतो आहे. देशासमोर महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, असेही पवार म्हणाले. दरम्यान, देशाची लोकसंख्या वाढली आहे. चीनला देखील लोकसंख्येच्या बाबतीत आपण मागे टाकले आहे. तरूणांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ज्येष्ठांची संख्या देखील वाढली आहे. घरामध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही ‘मेडीकल इमरजेन्सी’ आली तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र उपयुक्त आहे, असेही पवार यांनी सांगितले

पवारांनी घेतली पत्नीची फिरकी

अजित पवार यांनी यावेळी बोलताना लोकसंख्येचे प्रमाण व त्यातील तरूणांचा टक्का व ज्येष्ठांचा टक्का किती प्रमाणात आहे. याची माहिती दिली. ‘सध्या भारतात तरूणांची संख्या मोठी आहे. देशात ६० पेक्षा जास्त ज्येष्ठांची संख्या १० टक्के आहे. देशात १३ कोटी ५० लाख लोक ६० वर्षांच्या पुढचे आहेत. यामध्ये अजित पवारांचा सुद्धा नंबर लागतो आणि लवकरच सुनेत्राचा सुद्धा लागणार आहे, या वाक्यावर सुनेत्रा पवार यांनीही हसून दाद दिली. तर उपस्थितांमध्येही खसखस पिकली.

चपटीसाठी विकले पुलाच्या संरक्षक कठड्यावरील भाले

बारामती शहरात पुलाची उभारणी केल्यावर संरक्षक कठड्यावर काही ठिकाणी लोखंडी सळईचे भाले लावण्यात आले होते. परंतु लोकांनी ते सुद्धा जागेवर ठेवले नाहीत. चपटीसाठी पुलाच्या संरक्षक कठड्यावरील भाले विकले असल्याचा किस्सा   अजित पवार यांनी यावेळी सांगितला.
हेही वाचा 

Back to top button