नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? - राज ठाकरे | पुढारी

नाशिक : आपला धर्म इतका कमकुवत आहे का? - राज ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा बंद करण्यात काही अर्थ नाही. त्या चालू ठेवल्या पाहिजे. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आल्यावर भ्रष्ट होईल इतका आपला धर्म कमकुवत आहे का? त्र्यंबकेश्वर येथील गावकऱ्यांनी निर्णय घेतल्यावर बाहेरच्यांनी यात पडायला नको, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवरून धूप दाखवण्यावरून निर्माण झालेल्या वादावर ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी मंदिरे-मशिदी जवळजवळ आहेत. तेथे वर्षानुवर्षे परंपरा चालत आल्या आहेत. मुंबईतील माहिम येथील दर्गावर माहिम पोलिस ठाण्यातील अंमलदार चादर चढवतो. याउलट काही मंदिरांमध्ये विशिष्ट जातीतील लोकांनाच दर्शन दिले जाते. विविध धार्मिक स्थळांवर गेल्यानंतर माणसांची वृत्ती कळते. ज्या ठिकाणी मराठी मुसलमान राहतो तिथे दंगली होत नाहीत. दंगली कोणाला हव्या आहेत? चुकीच्या गोष्टींवर जोरदार प्रहार केला पाहिजे. बहुसंख्य हिंदू राज्यांमध्ये ‘हिंदु खतरे मे है’ कसे होईल. यास सोशल मीडियाही कारणीभूत आहे. निवडणुका जवळ येतील तसतसे हे प्रकार वाढत जातील, असा अंदाजही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. आम्ही शॅडो कॅबिनेट तयार केली होती. मात्र, कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्याने तिचे काम थांबले होते. आता हे कॅबिनेट कार्यान्वित केले जात आहे. त्याचप्रमाणे या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना आगामी निवडणुकीसाठी कामांची यादी देणार आहे. वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी या कामांचा आढावा दर १५ दिवसांनी घेतील, असेही ठाकरे यांनी सांगितले.

नोटबंदी संदर्भात ते म्हणाले की, हा निर्णय घेताना तज्ज्ञांना विचारायला हवे होते. तसे केले असते तर ही वेळ आली नसती, असे निर्णय परवडणारे नसतात. असे सरकार चालते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाशिक महानगरपालिकेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, शहर दत्तक घेतले म्हणजे काय? आमच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली तेवढी त्याआधीही झाली नव्हती व नंतरही झाली नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

हेही वाचा:

Back to top button