कोल्हारमध्ये उष्माघाताने झाला शेतकर्याचा मृत्यू ?

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील गोविंद पालवे (वय 55) या शेतकर्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतात काम करत असताना त्यांना अचानक घाम येऊ लागला व अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
पालवे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. अति उष्णतेमुळे शेतात काम करताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कोल्हारसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात उष्णतेची लाट आलेली असून, त्याचा शेतात राबणार्या शेतकरी व मजुरांना सामना करावा लागत आहे. अति उष्णतेमुळे अनेक मजूर सध्या कामावर येण्यास देखील नकार देत आहेत. उष्णता कमी झाल्यानंतर मजुरीसाठी कामावर जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.