नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक | पुढारी

नाशिक : आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला चपराक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील इंदिरानगरसारख्या वस्तीत वास्तव्यास असलेल्या उच्चशिक्षित मुलाने आई-वडिलांना घराबाहेर काढले. वृद्ध पालकांचा सांभाळ न करणाऱ्या या मुलाला नाशिकचे प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जतीन रहमान यांनी आई-वडिलांचे घर साेडण्याचे आदेश देत चपराक दिली आहे. माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्यांतर्गत हे आदेश देण्यात आलेत.

याबद्दलची माहिती अशी की, नाशिकच्या आयुर्विमा महामंडळातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी विजय बैरागी यांचे इंदिरानगर परिसरातील अजिंक्य सोसायटीत घर आहे. ते आजही या घराचे हप्ते पेन्शनमधून भरत असून त्यांच्या पत्नी सुरेखा बैरागी, मुलगा विशाल व सून वेदिका एकत्र राहात होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात सून व मुलाने बैरागी दाम्पत्याशी वाद घालत घर सोडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर मुलगा व सून पुण्याला जाऊन तेथे भरघोस पगार कमवू लागले. यादरम्यान, त्यांना दोन मुलेही झाली. मात्र, सून व मुलाने या वृद्ध दाम्पत्याचा सांभाळ करण्याऐवजी ते वडिलांकडून पैसे घेऊन जाऊ लागले.

मुलाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात या वृद्ध दाम्पत्याने प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर प्रांताधिकारी रहमान यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी विशाल बैरागीने वडील मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. त्यांना निवृत्तीच्या वेळी 50 लाख रुपये मिळले असून, त्यांची निफाडला बागायती शेती आहे. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह भत्त्याची गरज नसून ते विनाकारण त्रास देत असल्याचे तो म्हणाला. परंतु, रहमान यांनी मुलाचे सर्व दावे फेटाळून लावत घरातून निघून जावे. तसेच घर आई-वडिलांच्या ताब्यात द्यावे, असे आदेश दिले आहेत. इंदिरानगर पोलिसांनाही याप्रश्नी लक्ष ठेवण्याचे आदेशित केले आहे. विजय बैरागी यांच्यातर्फे अ‍ॅड. मनीषा मंडलिक यांनी काम पाहिले.

हेही वाचा:

Back to top button