उद्धव ठाकरेंच्या सभेला नाशिक देणार बळ | पुढारी

उद्धव ठाकरेंच्या सभेला नाशिक देणार बळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा उद्धव ठाकरे यांना मानणारा आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवणारा जिल्हा आहे. त्यामुळेच गद्दारांचे पितळ उघडे पाडण्यासाठी मालेगाव येथे 26 मार्चला होणाऱ्या विराट सभेसाठी नाशिक महानगरातून 20 हजार कार्यकर्ते जातील. त्यासाठी वाहनांची विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

मालेगाव सभेच्या पूर्वतयारीसाठी विभागनिहाय बैठका सुरू झाल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून सातपूर येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवसेनेच्या जिवावर मोठे झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दगा देऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांबद्दल निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा प्रक्षोभ असून, गद्दारांना धडा शिकविण्यासाठी ते सारे सज्ज झाल्याचे बडगुजर यांनी सांगितले. तर सातपूर विभागातून जास्तीत जास्त शिवसैनिक मालेगावच्या सभेसाठी जातील, असे पक्षाचे माजी गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले. यावेळी महानगरप्रमुख देवा जाधव, सुनील मौले, विजय बुरकुल, संतोष गायकवाड, योगेश गांगुर्डे, गौरव जाधव, प्रशांत पाटील, उमेश काळे, सुनील ठाकरे, विनोद जाधव, सनी पुंडे, अनिल वैद्य, दिनकर कांडेकर, वैभव ढिकले, साहेबराव पवार, विजय वाडेकर, समाधान देवरे, किरण बडे, श्रीरंग शेळके, मधुकर जाधव, इंद्रभान सांगळे, गोकुळ नागरे, निवृत्ती इंगोले, किशोर निकम, नरेश सोनवणे, हिरामण रोकडे, लोकेश गवळी आदी उपस्थित होते.

दगाबाजांचा कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने समाचार घेतील. उद्धव ठाकरे यांची मालेगावची सभा म्हणजे गद्दारांचा पोलखोल करणारीच ठरणार आहे. त्यामुळे आतापासूनच गद्दारांचे हातपाय लटपटायला लागले आहेत. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

हेही वाचा:

Back to top button