नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन संचालकांची तडकाफडकी बदली | पुढारी

नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन संचालकांची तडकाफडकी बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने, महापालिका वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या पदाचा कार्यभार पुन्हा एकदा डॉ. कल्पना कुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रजेवर जाता जाता शनिवारी (दि. ४) डॉ. पलोड यांच्या बदली आदेशावर स्वाक्षरी करीत, ते आदेश खातेप्रमुखांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यात आले आहेत.

डॉ. पलोड यांना घंटागाडी ठेक्यासह खतप्रकल्पातील भंगाराचा वाद भोवल्याची या बदलीनिमित्त चर्चा रंगत आहे. दरम्यान, २०२१ मध्ये डॉ. पलोड यांची महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. पलोड यांच्याकडे कोविड समन्वयक प्रमुखपदाची जबाबदारी असताना त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदाचा भार सोपविण्यात आल्याने डॉ. पलोड तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. पलोड यांच्याच कार्यकाळात घंटागाडीच्या नवीन ठेक्याची प्रक्रिया पूर्ण झाली. स्वच्छता अभियान २०२३ ची तयारी सुरू असतानाच आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी डॉ. पलोड यांची या पदावरून तडाकाफडकी बदली करत पुन्हा एकदा या पदावर डॉ. कुटे यांची नियुक्ती केली आहे.

बदलीमागे आमदाराचा हात
शनिवारी (दि. ४) दुपारी ३ नंतर यासंदर्भातील बदली आदेश महापालिका खातेप्रमुखांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध झाले. त्यामुळे चर्चेला उधान आले असून, बदलीची कारणमीमांसा सुरू झाली आहे. या बदलीमागे घंटागाडी ठेक्यातील अर्थकारण आणि खतप्रकल्पावरील भंगाराचा वाद कारणीभूत असल्याची सध्या चर्चा रंगत आहे. तसेच या बदलीमध्ये भाजपच्या एका आमदाराची मोठी भूमिका असल्याचीही चर्चा आहे.

हेही वाचा:

Back to top button