सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी सिंधुदुर्गातून असंख्य कार्यकर्ते रवाना! | पुढारी

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी सिंधुदुर्गातून असंख्य कार्यकर्ते रवाना!

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा :  उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानावर आज (रविवारी) सायंकाळी ५ वाजता शिवगर्जना सभा होत आहे. या सभेसाठी  ठाकरे गटाचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते कोकण रेल्वेने खेड येथील सभेसाठी रवाना झाले आहेत. यावेळी कुडाळ रेल्वे स्टेशन येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड येथे आज मोठी जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी संपूर्ण कोकणातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने खेड येथे दाखल होत आहेत. या सभेकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सभेसाठी रवाना झाले आहेत.

जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली रेल्वे स्टेशन येथून कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या सभेसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान सकाळी कुडाळ रेल्वे स्टेशन येथून निष्ठावंत कार्यकर्त्यांसमवेत आमदार वैभव नाईक मांडवी एक्सप्रेसने या सभेसाठी गेले आहेत. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, आमदार वैभव नाईक साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी खेडकडे आपला मोर्चा वळवला आहे.

          हेही वाचलंत का ?

 

Back to top button