संजय राऊत यांच्या एका सभेने वैफल्यग्रस्त झालात : संजय विभूतेंची आमदार बाबर यांच्यावर टीका | पुढारी

संजय राऊत यांच्या एका सभेने वैफल्यग्रस्त झालात : संजय विभूतेंची आमदार बाबर यांच्यावर टीका

विटा: पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या एका सभेने तुम्ही वैफल्यग्रस्त झालात, व्हायबल झाला आहात, त्यामुळे तुम्हाला खालच्या पातळीवर जाऊन बोलावे लागत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यावर केली.

वाझर (ता. खानापूर) येथील जाहीर सभेत आमदार बाबर यांनी थेट खासदार राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यावर संजय विभूते यांनी पत्रकार बैठक घेत उत्तर दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, ओबीसी संघटनेचे प्रमुख संग्राम माने आदी उपस्थित होते.

यावेळी विभूते म्हणाले की, खासदार राऊत यांच्या धावत्या दौऱ्याला जी गर्दी होती. ती उत्स्फूर्त गर्दी होती, आता येत्या १५ दिवसांत सुषमा अंधारे यांची सभा होणार आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, सत्ताधा ऱ्यांच्या विरोधात लोकांमध्ये संताप आहे. लोकांना माहित आहे, तुम्ही खोकी घेऊन तिकडे पळून गेलात. आता ती घेतलीत का नाहीत, ते तुमच्या अंतर्मनाला विचारा. त्यावर मी अधिक बोलणार नाही. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नव्हते, असे सांगता, मग त्यावेळी खानापूर मतदारसंघात आणलेला निधी काय घरादारावर, सातबारावर कर्ज काढून आणला होतात का ? तुम्ही इथे मुख्यमंत्री ठाकरे भेटत नाहीत असे सांगता. मात्र, मुंबईत ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे भेटायचे, त्यावेळी तुम्ही एका शब्दाने त्यांच्या समोर बोलत नव्हता, याला मी स्वतः साक्षीदार आहे. काहीही सांगून जनतेला गृहीत धरू नका, असे विभूते म्हणाले.

तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या पक्षात गेलात, त्या पक्षाचे कधीच झाला नाहीत. आमची विनंती आहे. आता आहात तिथे तरी थांबा. विरोधक जरी चांगले काम करीत असतील ते चांगल्याला चांगलं म्हणण्याची भूमिका ठेवा. जे काय केलं, ते सगळं मीच केलं की, ही भूमिका योग्य नाही. तुम्हाला शिवसेनेच्या मतावर लोकांनी निवडून दिले होते. आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी केले होते. कुणी कुणावर गद्दारी केली हे जनता ठरवेल. तुम्ही सांगता बाळासाहेबांचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो तुमचे शिवसेनेतले आयुष्य ७ वर्षांचे आहे. आमची पंचवीस तीस वर्षे आयुष्याची आम्ही पक्षासाठी घातली आहेत. ज्या बाळासाहेबांनी १९६६ पासून शिवसेना रुजवली, वाढवली. त्या बाळासाहेबांच्या कुटुंबीयांना तुम्ही संपवण्यासाठी कारस्थाने करण्याचे पाप तुम्ही केले आहे. जनता तुम्हाला सोडणार नाही, असेही विभूते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button