Prime Minister : महायुद्धोत्तर काळानंतर जागतिक नियामक व्यवस्था अपयशी ठरल्या-पंतप्रधान | पुढारी

Prime Minister : महायुद्धोत्तर काळानंतर जागतिक नियामक व्यवस्था अपयशी ठरल्या-पंतप्रधान

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा: महायुद्धोत्तर काळानंतर, भविष्यातील युद्ध रोखण्यात आणि सामाईक हितांच्या मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्याची भावना रुजवण्याच्या कर्तव्यात जागतिक नियामक व्यवस्था अपयशी ठरल्या. कोणत्याही निर्णयांचा ज्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे, अशा घटकांचा आवाज ऐकल्याशिवाय, कोणताही गट जागतिक नेतृत्व करत असल्याचा दावा करु शकत नाही. भारताच्या जी-२० अध्यक्षपदाने जगाच्या दक्षिणेकडील देशांना आवाज देण्याचा प्रयत्न केला आहे,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कान्फरेन्सिंगच्या माध्यमातून जी-२० च्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करतांना केले. (Prime Minister)

गेल्या काही वर्षांपासून जगातील वित्तीय संकट, हवामान बदलाचे संकट, महामारी, दहशतवाद आणि युद्धजन्य परिस्थिती बघितल्यास जागतिक नियामक संस्थांच्या संस्थापक अपयशी ठरल्याचे दिसून येते. या अपयशाचे सर्वाधिक वाईट परिणाम विकसनशील देशांना भोगावे लागले असून, इतक्या वर्षांच्या प्रगतीनंतरही जग आज शाश्वत विकासासाठी चाचपडतो आहे. अनेक विकसनशील देश, आज आपल्या नागरिकांना अन्न आणि ऊर्जा सुरक्षा देण्याच्या प्रयत्नात, अनिश्चित कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत, अशी खंत पंतप्रधानांनी बोलून दाखवली.

Prime Minister : संपूर्ण जग जी-२० कडे डोळे लावून बसले आहे

जग विभागले गेले असतांना परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत आजच्या भूराजकीय परिस्थितीचे सावट असणे स्वाभाविक आहे. पंरतु, तणाव दूर करण्यासाठी सर्वांची आपली एक भूमिका आणि दृष्टिकोन आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ यातून उद्दिष्टाची एकता आणि कृतीतील एकतेच्या गरजेचेही संकेत मिळतात. जी-२० बैठकीची संकल्पना वैश्विक पातळीवरील उद्दिष्टे आणि कृती या दोन्हीसाठी एकत्र येण्याची गरज दर्शवणारी आहे. आजच्या या बैठकीतून सामाईक आणि ठोस उद्दिष्टांसाठी एकत्रित येण्याची भावनाच व्यक्त होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

श्रीमंत देशांच्या धोरण आणि कृतीमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या संकटाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतो आहे. जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, या ठिकाणी उपस्थित नसलेल्यांची जबाबदारी देखील आपल्यावर आहे, हे विशेषत्वाने पंतप्रधानांनी नमूद केले. “विकास, आर्थिक बळकटी, संकटांशी सामना करण्याची शक्ती, आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय गुन्हे, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि अन्न तसेच उर्जा सुरक्षा, या साठी संपूर्ण जग जी-२० कडे डोळे लावून बसले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

ही बैठक महत्वाकांक्षी, सर्वसमावेशक आणि कृतीशील ठरेल

जी-२० कडे या मुद्द्यांवर एकमत घडवून आणण्याची आणि ठोस परिणाम देण्याची क्षमता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक संकटांच्या बाबतील जे मुद्दे आपण एकत्र बसून सोडवू शकतो त्यात, जे मुद्दे सोडवता येऊ शकत नाहीत त्यांचा अडथळा व्हायला नको. यावर त्यांनी भर दिला. ही बैठक गांधी आणि बुद्ध यांच्या देशात होत आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सर्व परराष्ट्र मंत्र्यांना भारताच्या सांस्कृतिक भावनेतून प्रेरणा घेऊन, आपल्याला विभागणाऱ्या गोष्टींकडे न बघता, ज्या गोष्टी आपल्याला एकत्र आणू शकतात, याकडे लक्ष देण्याची त्यांनी विनंती केली.

जी-२० ला एकीकडे विकास आणि कार्यक्षमता यात योग्य समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका पार पाडायची आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम करायचे आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. यासाठी, एकत्र काम करून हा समन्वय अधिक सहजतेने साधता येऊ शकेल, असे त्यांनी सुचवले. सर्वांच्या एकत्रित ज्ञान आणि क्षमतेवर विश्वास व्यक्त करीत पंतप्रधानांनी ही बैठक महत्वाकांक्षी, सर्वसमावेशक आणि कृतीशील ठरेल, आणि सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन  काही निर्णय घेतले जातील असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button