जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात | पुढारी

जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. गेल्या हंगामात कापसाला १२ ते १३ हजाराचा भाव मिळाला असल्याने यंदा कापूस लागवड वाढली. यंदा मात्र उत्पादनातच घट झाल्याने चांगला दर मिळाला तर उत्पादनातील घट भरून निघेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र योग्य भावच मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यात जवळपास ६५ टक्के शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने घरातच कापसाची साठवणूक केली आहे. मात्र आता घरात कापूस साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांपुढे आरोग्याचे संकट उभे ठाकले आहे.

बाजारात साडे सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल दरात कापूस विक्री करावा लागत असल्याने कापसाची साठवणूक करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला असून आता साठवणूक केलेल्या कापसात हानिकारक कीटक तयार झाले आहेत. आरोग्यावर अपायकारक परिणाम होत असल्याने आता शेतकरी बांधव दुहेरी कोंडीत सापडला आहे. कापसाला लहान-लहान किड्यांनी वेढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्वचेला धोकादायक खाज सुटत असून त्वचेवर लालसर ठिपके पडत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. कापसामुळे हातापायांवर, पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात खाज येत आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या जीवघेण्या खाजेने बेजार केले आहे.

फवारणीमुळे देखील धोका वाढला…
ज्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरून आहे, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सदस्यांना अंगावर खाज येण्याचा त्रास होत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकरी घरातील कपाशीवर किडनाशक फवारणी करतात. ही बाब अतिशय धोकादायक असून, घरातील लहान मुले किंवा खाद्य पदार्थांचा धोकादायक औषधांशी संपर्क आल्यास यातून मोठा अनर्थ ओढवण्याची संभाव्य शक्यता आहे.

कुटुंब घराबाहेर…
अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी घरातच कापून साठवून ठेवला आहे. या कपाशीमुळे घरात अतिशय सूक्ष्म किड पसरत आहे. यातून खाजऱ्या आजार वाढत असून, शेतकरी आपल्या घराच्या छतावर किंवा अंगणाताच झोपत आहेत. तसेच स्वयंपाकासाठी अंगणातच चुली थाटल्या असून, घराबाहेरच दिवसरात्र काढावी लागत आहे.

गेल्या वर्षी प्रतिक्विंटल कपाशीला १०,५०० रुपये भाव मिळाला होता. या वर्षी हे दर ७,८०० रुपयांवर आले आहेत. त्यात उत्पादनातही ३० टक्यांपर्यंत घट झाली आहे. या भावाने आता कापूस विक्री केला तर मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे भाववाढीची प्रतिक्षा असून, चार महिन्यांपासून कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, कापसामुळे त्वचारोग वाढल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांना खाज सुटली असून, अंगावर लाल चट्टे येऊ लागली आहेत. – उत्तम काळे, शेतकरी (कुऱ्हा, ता. भुसावळ).

हेही वाचा:

Back to top button