Delhi Mayor Election: आपच्या शैली ओबेरॉय बनल्या दिल्लीच्या महापौर; भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांचा पराभव

Delhi Mayor Election: आपच्या शैली ओबेरॉय बनल्या दिल्लीच्या महापौर; भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांनी बाजी मारली असून भाजपच्या नगरसेविका रेखा गुप्ता यांचा त्यांनी 34 मतांनी पराभव केला. ओबेरॉय यांना १५० तर भाजपच्या गुप्ता यांना ११६ मते मिळाली आहेत.

दिल्ली महापालिका काबीज केल्यापाठोपाठ आता महापौर निवडणुकीतही आम आदमी पक्षाने भाजपला उलटे अस्मान दाखविले आहे. महापौर निवडीसाठी याआधी तीनदा प्रक्रिया हाती घेण्यात आली होती, मात्र तीनही वेळा आप आणि भाजप नगरसेवकांदरम्यान राडेबाजी झाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करीत महापौर निवडीसाठी बुधवारी मतदान घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ही निवडणूक पार पडली. आम आदमी पक्षाच्या नगरसेविका शैली ओबेरॉय यांना १५० मते पडली तर भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मते पडली. महापौर निवडणुकीत ओबेरॉय यांचा विजय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच दिल्लीकर जनतेचे आभार मानले. 'गुंड लोकांचा पराभव झाला असून जनता जिंकली आहे' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महापौर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला होता. त्यानंतर आप आणि भाजप उमेदवारामध्ये लढत झाली. आधीचा राडेबाजीचा अनुभव लक्षात घेऊन मतदान स्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर २०२२ रोजी मतदान झाले होते. त्यात १३४ जागा जिंकत आम आदमी पक्षाने बाजी मारली होती. तर भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या ९ जागा आल्या होत्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news