पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, … तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? शरद पवारांच मोठं वक्तव्य | पुढारी

पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, ... तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? शरद पवारांच मोठं वक्तव्य

पुढारी ऑनलाईन: पहाटे झालेल्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पहाटे शपथविधी करून सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठली. राष्ट्रपती राजवट उठल्यानंतर काय झालं ते तुम्ही पाहिलं असेल, असंही शरद पवार म्हणाले.

तुम्हाला पहाटेच्या शपथविधीबाबत माहित होते का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर पवार म्हणाले की, जर राज्यात असं काही घडलं नसतं, तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? राष्ट्रपती राजवट उठली नसती, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 2019 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत पहाटे शपथ घेतली होती. परंतु हे सरकार काही तासांतच कोसळलं.

Back to top button