... तर अधिवेशनात विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी | पुढारी

... तर अधिवेशनात विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा – राज्य सरकारने शेतकरी प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. शेतीचे वीज कनेक्शन तोडणे थांबविले पाहिजे. नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये दिले पाहिजे. दिवसा विजेचा निर्णय झाला नाही तर येत्या अधिवेशनामध्ये विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते मा. खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या चेक नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला.

यावेळी शेट्टी पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकर्‍यांचे प्रश्न बाजूला राहिले आहे. जे सत्तेत आहेत ते मजेत आहेत. जे विरोधात आहेत ते शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. केंद्र सरकारचा गेल्या ६ वर्षात विम्यासाठी २५ हजार कोटी रुपये भरले असल्याचा दावा आहे आणि शेतकर्‍यांना परताव्यापोटी १ हजार २५ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे ही प्रधानमंत्री फसलयोजना शेतकर्‍यांसाठी आहे की कार्पोरेट कंपन्यांना डल्ला मारणारा आहे.

एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर आले आणि महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य अशी घोषणा केली. परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. सध्या उन्हाळा सुरुवात झाला आहे. विहिरीत व बोरमध्ये पाणी आहे. मात्र विजेची कनेक्शन तोडणी जात असल्याने पिके वाळत आहेत. शेतकरी १५ टक्के वीज वापरत असून ३० टक्के वीज वापरत असल्याचे खोटे रेकॉर्ड दाखवले जात असून शेतकर्‍यांना फसविले जात असल्याची आरोप शेट्टी यांनी केला.

बुधवारी साडेअकराच्या सुमारास उदगाव येथे महामार्ग रोखला. यावेळी वीज आमच्या हक्काची, शेतकर्‍यांची वीज तोडू नका, जाहीर केलेले ५० हजार रुपये द्या यासह विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सावकार मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, सागर शंभूशेट्टे, राजगोंडा पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध केला. या चक्काजाम आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर सुमारे १०किलोमिटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

यावेळी तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे, सुभाष शेट्टी, शैलेश चौगुले, राजाराम वरेकर, सुनिता चौगुले, भारती मगदूम, अजित पाटील, विशाल चौगुले, विश्वास बालीघाटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री सामंत यांचा समाचार

कोल्हापूर येथे मंत्री उदय सामंत यांनी राजू शेट्टी यांचे आंदोलन स्टंटबाजी असल्याचे भाष्य केले होते. यावर शेट्टी यांनी स्टंट कोण करतंय, हे आता लवकरच कळेल आणि ज्यांनी ५०-५० खोकी घेतली, त्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये. सोलापुरात ज्या शेतकर्‍याने १० पोती कांदा विकला, त्याला केवळ २ रुपये मिळाले आणि त्या व्यापार्‍याने हा चेक १५ दिवसांनी वटवा असे सांगितले. त्यामुळे किती हा निर्लज्जपणा आहे. त्यामुळे राज्यातील शेकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार कसा असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

Back to top button