Ratnagiri ZP : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ, पगार रत्नागिरीचा अन् काम करतात परजिल्ह्याचे | पुढारी

Ratnagiri ZP : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ, पगार रत्नागिरीचा अन् काम करतात परजिल्ह्याचे

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील (Ratnagiri ZP) तब्बल १६ कर्मचारी परजिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर काम करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘पगार रत्नागिरीत…काम मात्र परजिल्ह्यात’ अशी स्थिती आहे. याबाबत जि. प. प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून या कर्मचार्‍यांनी त्वरित हजर रहावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा आदेश काढला आहे.

जिल्हा परिषदमध्ये (Ratnagiri ZP) ‘कर्मचारी बदल्या’ हा विषय नेहमीच चर्चेचा व वादाचा ठरत आहे. विशेषकरून शिक्षकांच्या बदल्यांना गेले काही वर्षे विशेष महत्त्व आले आहे. त्याचबरोबर इतर बदल्याही वादग्रस्त ठरत आहेत. सध्या जि.प. भवनात प्रतिनियुक्ती बदल्या चर्चेत तसेच वादात सापडल्या आहेत. प्रशासनानेही याबाबत कडक पाऊल उचलले आहे.

जि. प. मधील १६ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर परजिल्ह्यात काम करत असल्याची बाब समोर आली आहे. थेट मंत्रालयातून आपले वजन वापरत या प्रतिनियुक्ती बदल्या करून घेतल्या जातात, अशी चर्चा आहे. या बदल्या करताना जि.प.ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असताना या १६ कर्मचार्‍यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे या बदल्या अनधिकृत असल्याचे सिद्ध झाले आहे.

प्रशासनाने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी याबाबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी आदेश काढला आहे. या १६ कर्मचार्‍यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द केल्या आहेत. या कर्मचार्‍यांनी मूळ आस्थापनाच्या ठिकाणी लवकरच रुजू व्हावे. रुजू होण्यास विलंब व टाळाटाळ केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे. यामुळे आता या कर्मचार्‍यांना हजर होण्याशिवाय पर्याय नाही.

स्थायी समितीची बैठक गाजली…

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला.

याबाबत सर्वच सदस्य आक्रमक बनले होते.

पगार आमचा घ्यायचा आणि काम मात्र दुसर्‍या जिल्ह्यात करायचे, ही बाब पूर्णपणे चुकीची असून याबाबत कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली.

Back to top button