Cyclone Gabriel : न्यूझीलंडमध्ये आणीबाणी जाहीर; गॅब्रिएल चक्रीवादळाचा मोठा फटका | पुढारी

Cyclone Gabriel : न्यूझीलंडमध्ये आणीबाणी जाहीर; गॅब्रिएल चक्रीवादळाचा मोठा फटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडच्या नॉर्थलँड, ऑकलँड भागाला गॅब्रिएल चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर पूर आणि भूस्खलन झाल्याने न्यझिलंड सरकारने आज (दि.१४) राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. न्यूझीलंडच्या इतिहासात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होण्याची ही तिसरी वेळ आहे. 2019 मध्ये ख्राइस्टचर्च दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि 2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात इतर दोन आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आल्या होत्या.

आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री किरन मॅकअनल्टी यांनी आणीबाणीची घोषणा केली. ही एक अभूतपूर्व हवामान घटना आहे ज्याचा उत्तर बेटावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यूझीलंडची हवामान संस्था मेटसर्व्हिसने सांगितले की, ऑकलंडच्या उत्तरेकडील वांगारेई शहरात गेल्या 24 तासांत 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. नॉर्थलँड प्रदेशात ताशी 140 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते, तर ताशी 110 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ऑकलंड हार्बर ब्रिज बंद करावा लागला. चक्रीवादळामुळे अजूनही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून जोरदार वाऱ्यामुळे नुकसान होऊ शकते, असे हवामान खात्याने सांगितले. ऑकलंड आणि नॉर्थ आयलंडमध्ये अनेक शाळा आणि स्थानिक सरकारी सुविधा बंद झाल्या आहेत. तसेच लोकांना प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

40 हजारांहून अधिक घरांमध्ये वीज खंडित

‘गॅब्रिएल’ चक्रीवादळामुळे न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाले आहे. तसेच समुद्राच्या लाटाही उसळत आहेत. न्यूझीलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 40 हजारहून अधिक घरांची वीज गेली आहे.

हेही वाचा : 

Back to top button