पुणे : वेल्ह्यातील चांदर गावांत पावसाने ४५ जनावरांचा मृत्यू

File photo
File photo

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत धरण खोऱ्यातील चांदर (ता. वेल्हे) या दुर्गम भागात ढगफुटी सदृश पाऊस कोसळत आहे. गेल्या चार दिवसांत मुसळधार पाऊस व गार वाऱ्याने गारठून शेळ्या, बैल, गाई, म्हैस अशी ४५ जनावरे मृत्युमुखी पडली. अनेक जनावरे आजारी पडली आहेत. दि. २४ ते दि. २७ जुलै या काळात हा प्रकार घडला आहे.

जनावरे दगावल्याने आदिवासी शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश पशुवैद्यकीय तसेच संबंधित विभागाला दिले आहेत. मारुती धोंडीबा सांगळे, गणेश येसु सांगळे, कोंडीबा गंगाराम सांगळे, पांडुरंग सांगळे, सिताराम बाबु सांगळे, विठ्ठल तात्याबा पोळ, रामचंद्र गणपत सांगळे व वसंत शिवाजी सांगळे या शेतकऱ्यांच्या ३६ शेळ्या, ७ गाई, बैल व म्हैस अशी ४५ जनावरे आतापर्यंत मुत्युमुखी पडली आहेत. तसेच काही जनावरे आजारी पडली आहेत.

वेल्हे – भोर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल पडवळ यांनी, पंचनामे करून आजारी जनावरांवर उपचार करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक शेतकरी चिंतामण सांगळे म्हणाले, रानात सोडलेल्या जनावरांचा थंडीने गारठून मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेल्हे तालुका पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉ.भास्कर धुमाळ म्हणाले, मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुत्यूचे कारण समजू शकेल. दरम्यान, गुरुवारी (दि. २८) सकाळी या घटनेची माहिती तालुका तहसीलदारांना मिळाली. चांदर येथे थेट पक्का रस्ता नसल्याने तेथे दुपार पर्यंत कोणी पोहचले नाही.

दोनच आठवड्यांपूर्वी चांदर जवळील डिगेवस्ती येथे अतिवृष्टीमुळे १५ जनावरांचा मृत्यू झाला होता. रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागात रानात जनावरे चारण्यासाठी सोडली जात आहेत. ही जनावरे अतिवृष्टी व गारठ्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच गोठ्यातही थंडीने गारठून जनावरांचा मृत्यू होत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले, डोंगर माथ्यावर चांदर, खाणु, डिगेवस्ती आदी वाड्या वस्त्या आहेत. तेथे जोरदार वाऱ्यासह धोधो पाऊस होत असल्याने जनावरांचे मृत्यू होत आहे. जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना शासन निर्णयाप्रमाणे भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news