टांगेवाला आसुमल....स्‍वयंघोषित संत ते बलात्‍कार प्रकरणातील कैदी आसाराम | पुढारी

टांगेवाला आसुमल....स्‍वयंघोषित संत ते बलात्‍कार प्रकरणातील कैदी आसाराम

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेकडो आश्रम, लाखो भक्त, हजारो भक्‍तांच्‍या साक्षीने दररोज होणारी प्रवचने, भक्तांसाठीचा देव, अशी सुमारे दहा ते ११ वर्षांपूर्वी स्‍वयंघोषित संत आसाराम बापू याची ओळख होती.  भक्‍त त्‍याला देव मानून पूजायचे, एकेकाळी देशातील बडे नेते डोके टेकवायसाठी त्‍यांच्‍या आश्रमाच्‍या पायर्‍या चढायचे. त्‍यांच्‍या भाविकांमध्‍ये अनेक मोठे राजकीय नेते, बॉलीवूड स्टार, मोठे उद्योगपती, अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. आश्रमात त्यांचा प्रत्येक शब्द हा काळ्या दगडावरची पांढरी रेषा मानला जायचा. मात्र २०१३ वर्ष उजाडलं आणि सारं काही बदललं. एका अल्‍पवयीन मुलीने आसारामबापूचा मुखवटा फाडला. 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी त्‍याला अटक झाली. तेव्‍हापासून तो कारागृहातच आहे. जाणून घेवूया स्‍वयंघोषित संत आसारामच्‍या उद्‍य आणि अस्‍ताची काहाणी…(Asarambapu  Rape Case)

Asarambapu Rape Case : पाकिस्तानमध्ये जन्म

आसारामचे खरे नाव आसुमल हरपलानी असे आहे. त्‍याचा जन्म पाकिस्तानच्या सिंध प्रांतात १९४१ मध्ये झाला, चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने शाळा सोडली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्‍यानंतर आसुमल हरपलानी याचे कुटुंब भारतात आले. संपूर्ण कुटुंब गुजरातमधील अहमदाबाद येथे वास्‍तव्‍यास करु लागले. त्‍याचे वडील अहमदाबादमध्ये कोळसा आणि लाकडाचा व्यापार करायचे; पण आसुमलचे मन त्यात गुंतले नाही. टांगा चालवणं, सायकलच्या दुकानात काम करणं अशी छोटी-मोठी नोकरी केली, पण आसाराम याची महत्त्‍वाकांक्षा प्रचंड होती.  यातूनच त्‍याने कच्छमधील संत लीला शाह बाबाच्या आश्रमात आश्रय घेतला.

संत लीला शाह यांचे अनुयायी असल्याचा दावा

छोट्या व कष्‍टाच्‍या कामाला कंटाळलेल्‍या आसारामने कच्छमधील संत लीला शाह बाबाच्या आश्रमात आश्रय घेतला. आपण बापू लीला शाह यांचा कट्टर अनुयायी असल्याचा दावा तो करत असे. प्रत्यक्षात संत लीला शाह यांनी त्यांना कधीच त्याला आपला शिष्य बनवले नाही. मात्र आसाराम बराच काळ आपला दावा खरा असल्‍याचे सांगत राहिला. त्‍याच्‍या भाविकांनाही ते पटलं. लीला शाह यांच्या आश्रमातच त्‍याने आपले आसुमल हे नाव बदलून आसाराम बापू असे नाव ठेवले.

सत्तरच्‍या दशकात स्‍वत:ला संत बनविण्‍याची मोहिम सुरु

पांढरे कपडे, पांढरी दाढी, लोकांमध्ये प्रवचन अशी आपली प्रतिमा तयार करत सत्तरच्या दशकात अहमदाबादमध्येच स्वत:ला संत बनवण्याची मोहीम त्‍याने सुरू झाली. आसारामचा पहिला आश्रम अहमदाबादमधील मोटेरा येथे साबरमती नदीच्या काठावर बांधण्यात आला. हळूहळू या आश्रमात भाविकांची गर्दी वाढली.आश्रमातील प्रवचनानंतर तो लोकांना प्रसाद म्हणून मोफत जेवण वाटप करत असे. मोफत जेवण देणारा आश्रम, अशी ओळख झाल्‍याने हळूहळू आसारामच्या भक्तांची संख्या वाढू लागली.

Asarambapu Rape Case

देशासह विदेशातील भाविकांच्‍या संख्‍येत लक्षणीय वाढ

काही वर्षांतच आसारामने गुजरातमधील जनतेमध्‍ये स्‍वत:चे स्‍वतंत्र असे स्‍थान निर्माण केले. आश्रमात प्रसादाच्या रूपात चांगला पैसा येऊ लागला. गुजरातमध्येच एका पाठोपाठ एक आसारामचे नवे आश्रम सुरू झाले. काही वर्षांमध्‍ये आसारामच्‍या आश्रमांची संख्‍येत लक्षणीय वाढ झाली. आश्रमाच्‍या माध्‍यमातून  त्याच्‍या धार्मिक पुस्तकांची विक्री होवू लागली. तसेच भाविकांना अगरबत्ती, प्रसाद, गोमूत्र अशा अनेक प्रकारच्या वस्तू आश्रमातच विकल्या जात होत्या. अवघ्‍या काही वर्षांमध्‍ये राज्‍यातील मध्‍यमवर्गीयांमध्‍ये आसारामची लोकप्रियता वाढली आणि त्‍याच्‍या अनुयायांच्‍या संख्‍येत प्रचंड वाढ झाली. गुजरातच्या बाहेरही आसारामचे भक्त निर्माण झाले. नव्वदच्या दशकाच्या अखेरीस देशातील अनेक मोठी नावे आसारामच्या अनुयायांमध्ये सामील झाली होती. आसारामचे देशभरातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात भक्त निर्माण झाले.

कोट्यवधींची संपत्ती, तब्‍बल १० हजार कोटींची उलाढाल

भाविकांची संख्या वाढल्याने आसारामच्‍या आश्रमाचे उत्पन्नही अनेक पटींनी वाढले. त्‍याने देश-विदेशात तब्‍बल ४०० हून अधिक आश्रम उघडले. आसाराम एक ट्रस्ट बनले. याची वर्षांची आर्थिक उलाढाल कोट्यवधी रुपये झाली. २०१६ मध्ये आसारामच्या ट्रस्टची कमाई १० हजार कोटींहून अधिक असल्याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात होता. आसारामच्या आश्रमात गुरुकुलच्या नावाने शाळाही चालवल्या जात होत्या, ज्यामध्ये त्यांचे भक्त त्यांच्या मुलांना प्रवेश घेत असत. मुलांच्या राहण्याची आणि खाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. या शाळांमध्ये शेकडो मुले शिकू लागली.

Asarambapu Rape Case : आश्रमात सापडले मुलांचे मृतदेह

२००८ पर्यंत आसारामबापू याचे गुजरातसह अन्‍य राज्‍यांमध्‍येही मोठे प्रस्‍थ झाले होते.  सर्वसामन्‍यांनी आनंदी कसे जगावे, याचे प्रवचन तो देत राहिला. मात्र २००८ मध्‍ये एक धक्‍कादायक माहिती समोर आली. आसारामच्‍या आश्रमातील शाळेत शिकणार्‍या गुजरातमधील अभिषेक वाघेला आणि दिपेश वाघेला या दहा वर्षांच्या चुलत भावांचे मृतदेह अर्धेवट जळालेल्या अवस्थेत नदीत सापडले. या बातमीने आसारामच्‍या भक्‍तांसह संपूर्ण देश हादरला. या घटनेनंतर आसारामच्‍या काळ्या कृत्‍यांविरोधात कुजबूज सुरु झाली. या प्रकरणी थेट आसारामवर कारवाई झाली नाही मात्र आसाराम ट्रस्टच्या काही लोकांवर गुन्हा दाखल झाला. येथूनच खर्‍या अर्थाने आसारामच्‍या साम्राज्‍याला तडे जाण्‍यास सुरुवात झाली.

बलात्काराचे आरोप आणि आसारामच्‍या साम्राज्‍य अस्‍ताला

२०१३ मध्‍ये एका अल्‍पवयीन मुलीने आसारामवर बलात्‍काराचा आरोप केला. पीडित मुलगी आसारामच्या छिंदवाडा येथील आश्रमात शिक्षणासाठी गेली होती. आसाराम बापूंची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. त्‍याच्‍यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्‍याला अटकही झाली. २०१३ मधील ही सर्वात मोठी कारवाई ठरली. यानंतर आसारामविरोधात उघडपणे बोलले जावू लागले.

Asarambapu Rape Case : आर्थिक साम्राज्‍याच्‍या जोरावर दडपशाहीचा प्रयत्‍न

आसारामविरोधातील बलात्‍काराचा खटल्‍याची जोधपूर न्यायालयात सुनावणी झाली. पुरावे आसारामविरोधात होते. गुन्हा दाखल करणारी मुलगी अल्पवयीन होती. आता शिक्षेतून सुटका होणार नाही हे लक्षात आल्‍यानंतर आसाराम व त्‍याच्‍या अनुयायींनी दडपशाही सुरु केली. साक्षीदारांवर हल्लेही झाले, काही साक्षीदारांची हत्या झाली. जोधपूरच्या विशेष न्यायालयात अनेक वर्षे खटला चालला. अखेर २०१८ मध्‍ये पीडित मुलीला न्‍याय मिळाला आणि आसारामला बलात्‍कार प्रकरणी जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावण्‍यात आली. तेव्‍हापासून आसाराम जोधपूर कारागृहात आहे. मात्र, आसारामचे अनुयायी आजही त्‍याला आपला गुरू मानतात. त्यांचे आश्रम आजही देश-विदेशात सुरू आहेत, पण कायद्याच्या नजरेत आसाराम हा आता संत नाही तर अल्पवयीन मुलीवरील बलात्‍कार प्रकरणातील आरोपी आहे.

Asarambapu Rape Case : मुलावरही गुन्हा दाखल

२०१६ मध्येही सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. या प्रकरणाचा खटला सुरतच्या न्यायालयात खटला सुरू आहे. एकामागून एक आसारामची गुन्‍हेगारी उघड झाली. आसारामच्या आश्रमात तांत्रिक विधी होत असत, यासाठीच २००८ मध्ये दोन मुलांची हत्या करण्यात आल्‍याचा आरोपही त्‍यावेळी झाला होता. मात्र, याप्रकरणी ठोस पुरावे मिळाले नाहीत. आसाराम व त्‍याचा मुलगा नारायण साई याच्‍यावर अनेक जमिनी जबरदस्तीने हडप केल्याचाही आरोप झाला. पांढर्‍या कपड्यामधील या स्‍वयंघोषित संताच्‍या कृत्‍याने सारा देश हादरला होता.

हेही वाचा 

Back to top button