अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना धमकी; पुण्यात गुन्हा दाखल, मुलानेच केली तक्रार | पुढारी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना धमकी; पुण्यात गुन्हा दाखल, मुलानेच केली तक्रार

पुणे, पुढारी ऑनलाईन: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि समाजसेवक श्याम मानव यांना आलेल्या धमकीप्रकरणी पुण्याच्या हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम मानव यांच्या मुलाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

श्याम मानव यांचा मुलगा क्षितिज यामिनी श्याम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 21 आणि 22 जानेवारीला व्हॉट्स ॲपवर त्यांना धमकीचे मेसेज आले आहेत. क्षितिज हे श्याम मानव यांच्या युट्युब चॅनेलच्या मॅनेजमेंटचं काम पाहतात, म्हणून त्यांचा मोबाईल नंबर तेथे देण्यात आला आहे. त्याच नंबरच्या व्हॉट्स ॲपवर शिवीगाळ करत बंदुकीतून गोळ्या घालण्याची आणि घरावर बॉम्ब फेकण्याची धमकी आली आहे. पुण्यातील बावधन परिसरात क्षितिज हे राहायला आहेत आणि त्यांना धमकीचे मेसेज आले तेव्हा ते घरीच होते. त्यामुळेच हा गुन्हा पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. आता त्या अज्ञातांचा शोध घेणं पोलिसांकडून सुरू आहे.

अज्ञात व्यक्तीने क्षितिज यांच्या नंबरवर फोन करुन शिवीगाळ केली. त्यांना धमकावण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. तसेच जान से मार दुंगा म्हणत त्यांना मेसेज केले. नंतर क्षितीज यांना घाणेरड्या भाषेतले मेसेजसुद्धा केले. यानंतर क्षितीज यांनी हे मेसेज थेट अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले. हे पाहून क्षितीज यांचे वडिल श्याम मानव यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी सांगितलं, असं या तक्रारीत नमूद केलं आहे.

मध्यप्रदेशमधील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना दिव्यशक्ती दाखविण्याचे चॅलेंज दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सह अध्यक्ष श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचे समोर आले होते. नागपूरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराजांनी आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचे सांगितले होते. त्यांनी भक्तांसमोर विविध चमत्कार दाखवल्याचा दावा केला होता. तसेच आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दलची सर्व माहिती चेहरा बघून सांगितल्याचा दावा देखील केला होता. कोणाच्या घरी काय ठेवले आहे? आणि कुठे ठेवले आहे? हेही सांगितले होते. या प्रकारानंतर धीरेंद्र महाराजांनी नागपुरात येऊन ‘दिव्यशक्ती’ सिद्ध करण्याचे चॅलेंज श्याम मानव यांनी दिलं होतं. त्यावरुन मोठ्या प्रमाणावर वादावादी सुरु आहे.

Back to top button