नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांची क्लिन चीट! | पुढारी

नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांची क्लिन चीट!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात अंधश्रद्धा पसरविल्याचे दिसत नसल्याने त्यांच्यावर कोणताही दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. अंनिसचे संस्थापक, अध्यक्ष श्याम मानव यांच्यासह अनेकांनी यामुळे खेद व्यक्त केला.

यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या ७ व ८ जानेवारीच्या दिव्य दरबाराच्या संदर्भातील व्हिडिओ आम्ही बारकाईने तपासली आहे. त्यामध्ये २०१३ च्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळून आलेले नाही. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात नागपूर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. यात बागेश्वर सरकार यांनी आपल्याकडे दिव्य शक्ती असल्याचे सांगत अंधश्रद्धा पसरवित असल्याचा दावा करण्यात आला होता. समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा श्याम मानव यांनी बागेश्वरधामचे धिरेंद्र शास्त्री महाराज यांना दिव्यशक्ती सिद्ध करून दाखविल्यास ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे करण्यात आले. यांसदर्भात नागपूर पोलिसांनी बुधवारी यावर स्पष्टीकरण दिले. या प्रकरणात अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

यावर नागपूर पोलिसांचे वकीली डोके नसल्याची प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बुधवारी (दि.२५) दिली. २०१३ साली अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तसेच जादूटोणा विरोधी कायदा तयार झाल्यानंतर शेकडो पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण या कायद्याविषयी मार्गदर्शन करून अनेक ढोंगी बाबांविरोधात गुन्हे दाखल करीत त्यांना जेरबंद केले. हा कायदा तयार होत असताना त्यावेळच्या आदिवासी मंत्र्यांनी मला हा कायदा फक्त आदिवासी आणि दलितांविरोधात काम करेल अशी माहिती दिली होती.

पोलिसांच्या निर्णयानंतर या बहुचर्चित प्रकरणात आता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि गुन्हे विभागाचे एसीपी, तपासी अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील पाऊल उचलणार असल्याची भूमिका श्याम मानव यांनी बोलून दाखविली. पोलिसांचा आजचा निर्णय म्हणजेच औरंगाबाद उच्च न्यायालयाचा अवमान असल्याची खंत देखील श्याम मानव यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button