नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक- मतदानासाठी रांगा, सकाळच्या टप्प्यात १३.५७ टक्के मतदान | पुढारी

 नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक- मतदानासाठी रांगा, सकाळच्या टप्प्यात १३.५७ टक्के मतदान

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी १३.५७ टक्के शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार गळ्यात दुपट्टा घालून आल्याने मोहात सायन्स केंद्रावर आक्षेप घेण्यात आला. याचप्रकारे काही केंद्रावर किरकोळ आक्षेप घेण्याचे प्रकार दिसून आले. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजल्यापासून तर अन्य पाच जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा २२ उमेदवार रिंगणात असून यात खरी लढत रालोआ समर्थित नागो गाणार, महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबाले व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात आहे. यंदा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचारात असून इतर मुद्दे त्यामुळे मागे पडले आहेत.

 नागपूर शिक्षक मतदार संघ : सकाळच्या टप्प्यात १३.५७ टक्के मतदान

नागपुरात मोहता विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला दुपट्टा घालून मतदान केंद्रात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काहीसे तणातणीचे वातावरण तयार झाले होते. काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर  मतदान सुरु असून  सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत १२.८६ टक्के मतदान झाले. नागपूर जिल्ह्यामध्ये  43 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्हयात सकाळी १०.०० वाजेपर्यंत ११.९४ टक्के मतदान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर मतदान होत असून १३.१२ टक्के मतदान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्ह्यात ११.८३ टक्के मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात  १४ मतदान केंद्रावर मतदान होत असून १५.४९ टक्के मतदान झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्ह्यात १७.२९ टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button