मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण अपघातात १० ठार, रस्त्यावर पडला रक्ताचा सडा | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण अपघातात १० ठार, रस्त्यावर पडला रक्ताचा सडा

माणगाव;पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडून गुहागरकडे निघालेल्या इको कार व चिपळूण लांजा येथून मुंबईकडे निघालेल्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.  तर एका चार वर्षाच्या बालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथून अधिक उपचाराकरिता मुंबई येथे घेऊन जात असताना वाटेतच पाली गावाजवळ त्याचा मृत्यू झाला.  या अपघातात एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली. या अपघाताची माहिती समजताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोवा येथून  मुंबईकडे (क्रमांक एम. एच. ४३ जी ७११९ ) हा ट्रक जात असताना महाडकडून येणाऱ्या इको कार (एम.एम.४८ बीटी ८६७३ ) ची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील अमोल रामचंद्र जाधव (वय-४०, रा. हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) निलेश चंद्रकांत पंडित (वय ४५, रा.हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), दिनेश रघुनाथ जाधव (वय ३०, रा. हेदवी ता. गुहागर जि. रत्नागिरी), निशांत शशिकांत जाधव (वय २३, रा. विरार पूर्व, कोकण निवास नारंगी रोड), स्नेहा संतोष सावंत (वय ४५, रा. कलमबिष्ट, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग सध्या रा. जोगेश्वरी मुंबई), कांचन काशिनाथ शिर्के (वय ५८, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी सध्या रा. नवी मुंबई), दीपक यशवंत लाड( वय ६०, रा. कॉटन ग्रीन मुंबई), मुद्रा निलेश पंडित (वय १२, रा. हेदवी ता. गुहागर जि. रत्नागिरी सध्या रा. मुंबई), नंदिनी निलेश पंडित (वय ४०, रा. हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, सध्या रा. मुंबई) या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर भव्य निलेश पंडित (वय ४, रा. हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी सध्या रा.मुंबई) या बालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर अधिक उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना वाटेतच पाली गावाजवळ त्याचा मृत्यू झाला. असे एकूण १० जणांचा या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये एका बालकाचा, ४ महिलांचा व ५ पुरुषांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, गोरेगाव पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काकतकर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत तसेच साळुंके रेस्क्यू टीम व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत तसेच रुग्णवाहिका चालक संदेश घरवे व सहकारी अपघात ठिकाणी दाखल झाले. गोरेगाव व माणगाव पोलीस तसेच साळुंके रेस्क्यू टीम व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी अपघातातील मृत्युमुखी पडलेल्यांना तसेच गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय बालकाला रुग्णवाहिकेने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.  चार वर्षीय बालकाला अधिक उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात असताना वाटेतच त्याच्या मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारा हा महाभयंकर असा अपघात होता. या अपघाताची माहिती मिळाल्यावर माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्यासह अनेक माणगावकरांनी सकाळी लवकर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत.

मुंबई – गोवा महामार्गाचे काम करण्याची मागणी

माणगावपासून १० किमी अंतरावर असणाऱ्या लोणेरे गावावरून माणगावच्या दिशेने येण्यासाठी पुढे डबल लेन सुरु होतो तो गारळच्या फाटायपर्यंत डबल लेन सुरु आहे. मात्र लेन बदलण्यासाठी जो डायव्हर्शन आहे तो अतिशय खराब असल्यामुळे ड्रायव्हर डाव्या लेनला न जाता सरळ उजव्या लेनकडून गाडी पळवतात त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. मुंबई – गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button