सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू करण्यासाठी पितृस्मृती आंदोलन! - पुढारी

सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू करण्यासाठी पितृस्मृती आंदोलन!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे ५ नोव्हेंबरपासून सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा अमान्य असल्याचे सांगत रंगकर्मींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे.

क्रांतीदिनी ९ ऑगस्टला केलेल्या आंदोलनानंतर सांस्कृतिक मंत्र्यांना कलाकारांच्या मागण्यांना तत्वतः मान्यता दिली होती. मात्र, एका महिन्यानंतरही यासंदर्भात शासन निर्णय निघाला नसल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २७ सप्टेंबरला कलावंतांनी सरकारचे प्रतिकात्मक ‘पितृस्मृती’ श्राद्धविधी करण्याचे आंदोलन पुकारले आहे.

मुंबईतील रंगकर्मींनी २७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथे जमून पितृपक्ष श्राद्ध आणि पिंडदान विधी करणार असल्याचे सांगितले.

कलाकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञात-अज्ञात अशा सर्व पितरांच्या ऋणांचे स्मरण पितृपंधरावड्यात केले जाते. त्यांच्यामुळे आपण आहोत, याची जाणीव ठेऊन हे स्मरण केले जाते. कलेची जोपासना करणार्‍या रंगकर्मींना कलेचा ठेवा आपल्या पूर्वजांकडून मिळाला आहे.

असंख्य प्रतिभावान कलावंतानी त्यांच्या कलांनी आपली संस्कृती जपली, वाढवली. आजची परिस्थिती पाहून जे कलावंत आज हयात नाहीत, त्यांनाही नक्कीच वेदना झाल्या असतील. त्यांच्या स्मृती जागवत कलेचा जागर पुन्हा सर्वत्र व्हावा.

यासाठी पितृपक्ष पंधरवड्यातील सोमवारी, २७ सप्टेंबरला राज्यातील रंगकर्मींनी या आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात रंगकर्मी आपापल्या जिल्ह्यात ‘पितृस्मृती’ श्राद्धविधीच्या कार्यक्रमाचे आयोजन करतील.

Back to top button