Deepotsav : दीपोत्सव…आनंदोत्सवाला प्रारंभ | पुढारी

Deepotsav : दीपोत्सव...आनंदोत्सवाला प्रारंभ

मानवी नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, असा प्रत्येक सणाचा उद्देश असतो. दिवाळीही (Deepotsav) त्याला अपवाद नाही. या निमित्ताने घरोघरी दिव्यांची उजळण केली जाते. मनातील अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश जागृत व्हावा, असा हेतू त्यामागे आहे. इतरांच्या आयुष्यात आनंद फुलला तर त्यामध्ये आपलाही आनंद आहे, ही भावना वाढीस लागायला हवी.

चैतन्याचा उत्सव म्हणजे दिवाळी. या सणाचं आपल्याकडे जेवढं महत्त्व इतर काेणत्‍याही सणाचे नाही. मुळात आपण सण का साजरा करताे, त्यामागे एक भावार्थ दडलेला असतो. तो आपण समजून घेण्याची गरज आहे. पूर्वी धार्मिक कारणासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांना आता सामाजिक रूप द्यायला हवं. त्या निमित्ताने दिवाळीच्या भावार्थाकडे पहायला हवं.

दिवाळीचा दिवस उजाडताना जणू नवा प्रकाश घेऊन येतो. दिवाळी आपल्याकडे फार प्राचीन काळापासून साजरी केली जाते. आता आधुनिक काळात या सणाचं स्वरूप बदललं आहे. दिवाळी हा धार्मिक आणि अंतर्मनाला सारख्याच प्रमाणात प्रफुल्लित करणारा आगळावेगळा सण आहे. वर्षभरात चिंतेची, अडचणींची मरगळ दूर करून थोडंफार का होईना सर्वांना समाधान लाभावं, त्यांना आनंद उपभोगता यावा, यासाठी दिवाळीचा सण साजरा केला जातो. यावेळी अनेक नव्या गोष्टींची खरेदी केली जाते. दिवाळी म्हणजे माणसामाणसातील सद्भावनांच्या ऐश्वर्याला येणारं उधाणच म्हणायला हवं.

धनत्रयोदशीपासून या उत्सवाला सुरुवात होते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी येते. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हा देवांचा वैद्य समजला जातो. त्याची पूजा करून आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं, अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी व्यापारीही त्यांच्याकडे असलेल्या धनाची पूजा करतात. या दिवशी घने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच प्रसाद म्हणून वाटला जातो.

Deepotsav : नरकचतुर्दशी  

नरकचतुर्दशी हा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस. बऱ्याच ठिकाणी याला ‘पहिली आंघोळ’ असं म्हणतात. या दिवशी केल्या जाणाऱ्या स्नानाला ‘अभ्यंगस्नान’ असं म्हणतात. या अभ्यंगस्नानाचंही आपल्याकडे खूप महत्त्व आहे. या दिवशी अंगाला उटणं लावून स्नान करावं, असं सांगण्यात आलं आहे. पूर्वी कोणतीही रसायनं मिश्रीत न केलेलं उटणं तयार करत आणि ते अंगाला चोळून स्नान करण्याची पद्धत आपल्याकडे होती. यातून आरोग्याविषयीही जागृती होत असे. असं उटणं अंगाला लावल्यामुळे त्वचेला एक प्रकारचा तजेला मिळतो. त्यासाठीच अंगाला उटणं लावून स्नान करण्याची पद्धत आपल्याकडे होती आणि आजही आहे; पण आज विविध रसायनं मिश्रीत केलेलं उटणं अंगाला लावलं जातं.

आपल्याकडे अभ्यंगस्नानाचीही वेळ सांगण्यात आली आहे. चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करावं, असं सांगण्यात आलं आहे. चंद्राच्या शीतल प्रकाशाचा आपल्याला लाभ व्हावा, असा उद्देश यामागे आहे. या दिवशी नरकासुर राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने वध केला. कोकणात हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी कारंटं नावाचं एक फळ घेतात. ते नरकासुराचं प्रतीक समजलं जातं. हे कारंट पायाखाली चिरडलं जातं. अशा प्रकारे नरकासुराचा वध झाला, असं समजलं जातं. कोकणात या दिवसाला चाव दिवस असंही म्हणतात. या दिवशी चावून खाण्याचे पदार्थ खाल्ले जातात. या दिवशी चकली, कडबोळी असे पदार्थ फराळ म्हणून खाल्ले जातात. नरकचतुर्दशी हा दिवाळीचा पहिला दिवस समजला जातो. हा दिवस आपल्याकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानंतर लक्ष्मीपूजन येतं. प्रदोषकाली लक्ष्मीचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. आपल्याकडे भाग्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, विजयलक्ष्मी असे लक्ष्मीचे प्रकार आहेत. या दिवशी धनलक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीबरोबरच या दिवशी कुबेराचीही पूजा केली जाते. या दिवशी व्यापारी मंडळी ज्यावर हिशेब लिहितात त्या चोपडीचीही पूजा करतात.

Deepotsav : बलीप्रतिपदा

धार्मिक शुक्ल प्रतिपदेचा दिवस हा बलीप्रतिपदेचा असतो. या दिवशी बळीराजाच्या मस्तकावर वामनाने तिसरं पाऊल ठेवलं. आज शेतकरी हा आपला बळीराजा आहे. त्यामुळे शेतकरी हा सण आनंदाने साजरा करतात. भरपूर मेहनत घेऊन बळीराजा धान्य पिकवतो आणि त्याच आधारावर आपण जगत असतो. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने बळीराजा आनंदात असणं स्वाभाविक आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशीच विक्रम संवत सुरू होतं. त्यामुळे आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये या दिवसाचं महत्त्व काही वेगळंच आहे.

Deepotsav
Deepotsav

भाऊबीज

भाऊबिजेचा हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भावा-बहिणीच्या नात्यातील दृढ परंपरा यामागे आहे. बहिणींचं लग्न झालेलं असेल तर भाऊ तिच्या घरी औक्षण करून घेण्यासाठी जातो. या दिवशी यमराजही आपल्या बहिणीकडे गेले होते. त्यामुळे या दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. भावा-बहिणीचं नातं अधिक दृढ व्हावं, असा या दिवसाचा उद्देश आहे. ज्या बहिणीला भाऊ नसतो त्या या दिवशी चंद्राला औक्षण करतात. चंद्रानेही आपल्या भावाप्रमाणेच काळजी घ्यावी, अशी यामागील कल्पना आहे.

शेतीप्रधान उत्सव

कौटुंबिक नातं दृढ करण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात पिकं तयार होत असतात. त्यामुळे या दिवसात पार्थिव गणेश पूजन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. हे पार्थिव गणेश पूजन म्हणजे पृथ्वीचीच पूजा असते. त्यापाठोपाठ नवरात्र येते आणि त्यानंतर दिवाळी साजरी केली जाते. शेतकऱ्यांशी संबंधित हे सण आहेत. त्याचबरोबर ज्या धरतीने आपल्याला धान्य दिलं तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सण साजरे केले जातात. दिवाळीही त्याला अपवाद नाही. या निमित्ताने घरातील धान्याची पूजा होते. दिवाळी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या निमित्ताने बलीप्रतिपदेच्या दिवशी विविध मौल्यवान गोष्टींची खरेदी केली जाते. पूर्वी या दिवशी प्रत्येक शेतक-याच्या घरात नवीन धान्य आलेलं असायचं. त्या धान्याला लक्ष्मी मानून त्याची पूजा केली जात असे.

Deepotsav
Deepotsav

Deepotsav : परंपरा आकाशकंदिलांची

आपल्याकडे दिवाळीत आकाशकंदील लावण्याची प्रथा आहे. ही संकल्पना मुळात चीन आणि जपानमधील आहे. या देशातूनच ही पद्धत भारतात आली. यावेळी आकाशात आपल्या पितरांसाठी दिवा लावण्याची पद्धत आहे. आपण पृथ्वीवर सुखात आहोत, हे पितरांना सांगण्याचीही संकल्पना यामागे आहे. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. अलीकडच्या काळात दिवाळीत थर्माकोलचे आकाशकंदील केले जातात; पण ते पर्यावरणाला घातक आहेत. दिवाळी साजरी करताना आपण पर्यावरणाबाबतही जागरुक असायला हवं. त्यामुळे या दिवशी पूर्वीप्रमाणेच काठ्यांपासून बनवलेले आकाशकंदील लावायला हरकत नाही. हीच गोष्ट फटाक्यांबाबतही लक्षात ठेवली पाहिजे. ही पद्धतही आपण चीनकडून घेतली आहे. चीनमध्ये सणांच्या दिवशी फटाके लावले जात असत. त्यांच्याप्रमाणेच आपणही ते लावायला सुरुवात केली; पण फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. फटाके वाजवायला हकरत नाही; पण ते जास्त आवाज करणारे नसावेत.

निर्भेळ आणि पर्यावरणपूरक आनंद

एखाद्या गोष्टीचा आपण आनंद घेत असताना इतरांनाही तो आनंद मिळाला पाहिजे, याचं भान कोणताही सण साजरा करताना ठेवलं पाहिजे. त्यामुळेच आपण मोठ्या आवाजाचे फटाके वाजवताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. आपण आनंदोत्सव साजरा करत असताना इतरांना त्यापासून हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. कोणत्याही सणाच्या काळात गरिबांना मदत करण्याची वृत्ती आपल्याकडे असायला हवी. इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यांच्या जीवनात आनंद फुलला तर त्यात आपणही आनंद मानला पाहिजे. एका गावाची एक दिवाळी अशा पद्धतीनेही हा सण साजरा करता येईल. गावातील एखाद्या मोकळ्या जागी सर्वांनी एकत्रितपणे फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येईल. ‘एक गाव एक गणपती’ प्रमाणे ‘एक गाव एक दिवाळी’ आपल्याला साजरी करता येणे शक्य आहे. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम होतात. या निमित्ताने अनेक गायकांच्या मैफिली ऐकायला मिळतात. हजारो रसिक त्या निमित्ताने एकत्र येतात. अशा प्रकारचे उपक्रम स्तुत्यच आहेत. असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले गेले पाहिजेत.

Deepotsav
Deepotsav

( दा.कृ.सोमण लिखित संदेश दिपोत्सवाचा या लेखाची पूर्वप्रसिद्धी दि. ११ नोव्हेंबर २०१२ दैनिक पुढारी-बहार पुरवणीत झाली आहे.)

हेही वाचा:

Back to top button