औरंगाबाद : पैठण तालुक्‍यातील नाथसागर धरण ५१.६५ टक्‍के भरले | पुढारी

औरंगाबाद : पैठण तालुक्‍यातील नाथसागर धरण ५१.६५ टक्‍के भरले

पैठण ; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यात व नाथसागर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे येथील नाथसागर धरण ५१.६५ टक्के भरले आहे. सध्या धरणामध्ये ३३ हजार ४०७ क्युसेक पाणी दाखल होत आहे.

गेल्या तीन दिवसापासून पैठण तालुक्यासह नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले असून, शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच रहदारी करणाऱ्या रस्त्याची मोठे नुकसान झाले आहे.

आतापर्यंत पैठण तालुक्यात विहामांडवा ८२०, लोहगाव ५८४, पाचोड ७१५, आडुळ ७१९, नांदर ७८७, बालनगर ६६३, ढोरकीन ६१८, बिडकीन ६६८, पिंपळवाडी पिं ५९१, पैठण शहर ५७७ या परिसरात एकूण ६७.४२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

सर्वाधिक पाऊस विहामांडवा येथे झाला असून, ८२० मी.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश फुलंब्री पैठण उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. नुकसानग्रसत गावातील ग्रामसेवक, मंडळाधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांना हे आदेश दिले आहेत. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते व पुलाची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

पुलांची व रस्त्याची दुरवस्था संदर्भात प्रत्‍यक्ष गावात जाऊन नागरिकांचा जाण्या-येण्याचा मार्ग सुरळीत करून दुरुस्ती पंचनामा तात्काळ सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बोरकर यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

Back to top button