आखाडा बाळापूर (हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा-आखाडा बाळापूरच्या जवळच असलेल्या बायपास रोडवर पोलिसांना रात्री गस्त घालत असताना एका तरुणाचा मृतदेह दिसला. ३५ वर्षीय शेख शकील शेख खाजा असे त्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी रात्रीच नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याकरता आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.
याबाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांनी माहिती दिली की, मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी रात्रीला पोलीस जीपने गस्त घालत असताना आखाडा बाळापूर जवळ बायपास हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. शेख शकील शेख खाजा (वय ३५, रा. आखाडा बाळापूर) अशी तरुणाची ओळख पटवली आहे. मृतदेह आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहे.
हा तरुण मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी सहा वाजता घरातून निघून गेल्याचे ऐकण्यात आले. त्यानंतर रात्रीला पोलीस जीप गस्तीमध्ये त्याचा मृतदेह सापडल्याचे समजताच सकाळी ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरिकांचा जमाव जमला. त्यापैकी काहींनी प्रथम खुनाचा गुन्हा दाखल करा आणि नंतर शवविच्छेदन करा अशी पोलिसांना अट घातली होती. पण बाळापूर येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी जमावाला मार्गदर्शन करून अगोदर शवविच्छेदन होऊ द्या. नंतर गुन्हा दाखल करता येईल अशी समजूत घातल्याने तणाव निवळला.
आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयासमोर तरुणांचा मोठा जमा दिसून आला. याबाबत मृतदेहाच्या डोक्याला जब्बर जखम झालेली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पीसी बोधनापोड यांनी सांगितले. शिवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे कारम समजमार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.