किमान वेतनासाठी संगणक परिचालकांचे आझाद मैदानात आंदोलन | पुढारी

किमान वेतनासाठी संगणक परिचालकांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई: पुढारी वृत्तसेवा: आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचारिकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१) आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने परिचालक सहभागी झाले होते.

संगणक परिचालक एकजुटीचा विजय असो, विजय असो असो, संगणक परिचालकांना निधी मिळालाच पाहिजे, शासकीय कर्मचारी दर्जा मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी आझाद मैदान दणाणून केले होते. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील ११ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. ग्रामीण भागातील सुमारे सात कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक अविरत करीत आहे. त्यासोबत कोरोना काळात महत्त्वाची जबाबदारी त्यांनी बजावली होती. तर 19 संगणक परिचालकांनी जीव गमावला होता.

शेतकरी कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत 54 लाख कुटुंबांचा सर्व्हे संगणक परिचालकांनी केला. परंतु, महागाईच्या काळात त्यांना अतिशय कमी मानधन मिळते, तेही कधी वेळेवर मिळत नाही, संगणक परिचालक हे ग्रामपंचायतमध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही आझाद मैदानात धरणे आंदोलन केल्याचे सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button