एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं | पुढारी

एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी फोनवरुन झालेल्या चर्चेला पुष्टी दिली आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

याबाबत भाजपा खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि मी अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलो होतो परंतु शाह त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेटू शकले नाहीत. मात्र फोनवरून चर्चा झाली आहे. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही. ज्यांना राजकारण करायचं असेल ते करणारच आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपात येणार आहेत असं मला माहिती नाही. मी भाजपात आहे आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत असं त्यांनी सांगितले.

मोदी-शहांशी माझे जुने संबंध…
एकनाथ खडसे यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलंय. नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत, तसंच अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहांना भेटू नये, असा काही नियम आहे का? माझा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींशी परिचय आजचा नसून फार पूर्वीपासूनचा आहे. मी अमित शहांना एकदाच भेटलो असं नाही, या आधीही मी अनेकदा त्यांना भेटलो आहे आणि नंतरही भेटणार आहे. देवेंद्रजींनाही मी आधी भेटलो आणि पुढेही भेटणार आहे. त्यामुळे याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.

त्यामुळेच राष्ट्रवादीत केला प्रवेश…
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १ वर्षापूर्वी खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. विरोधी पक्षनेतेपदापासून महसूल मंत्री असा त्यांना प्रवास आहे. मुख्यमंत्रिपदापासाठी एकनाथ खडसेंचे नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना संधी दिली. त्यानंतर पक्षात होत असलेलं खच्चीकरण पाहता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. यावेळी त्यांनी माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा ;

Back to top button