शेवगाव : औषध फवारणीनंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू | पुढारी

शेवगाव : औषध फवारणीनंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : कपाशीवर औषध फवारल्यानंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे घडली. मृतांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहेे.
वैभव आबासाहेब बिडकर (वय 28 रा.आखेगाव ता. शेवगाव) आणि कृष्णा बबन काकडे (वय 30 रा.सोमठाणे ता. पाथर्डी) मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. घटनेवेळी त्यांच्यासोबत अन्य चौघे होते, मात्र, दोघांंच्या मृत्यूनंतर हे चौघे पसार झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

आखेगाव परिसरात सहा मजुर गुरूवारी कपाशीवर औषध फवारणीसाठी गेले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान कपाशी फवारणीनंतर ते सोमठाणा शिवारातील एका शेतात बसले होते. कोणीच घरी आले नसल्याने कुटुंबियांनी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मोबाईलवर दुसरीच व्यक्ती बोलली. दोघे येथे पडल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शेवगाव येथील रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा काकडे यास शेवगावच्या रुग्णालयात, तर वैभव बिडकर यास नगर येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या दोघांबरोबर असणार्‍या फरार चौघांचा शोेध पोलिसांकडून सुरू आहे.

 

Back to top button