नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील | पुढारी

नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील नेते पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नसून, मनमाड नगर परिषदेत राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक असताना, वेळेवर एकही कामाला येत नाही. पक्ष सदस्य नोंदणीसाठी गेल्यावर तुमचा पक्ष काय भेटवस्तू देणार, अशी विचारणा नागरिक करतात. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, कशी सदस्य नोंदणी करायची, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे उपस्थित केले. त्यावर भाजपचा अश्वमेध रोखण्याची क्षमता राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून कामाला लागावे. पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांनाच निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, अशी घोषणा पाटील यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. 22) मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनामध्ये शहर-जिल्हा सक्रिय कार्यकर्ता नोंदणीचा आढावा घेतला. या आढाव्याप्रसंगी पदाधिकार्‍यांनी पाटील यांच्यापुढे तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे काही काळ पाटीलदेखील स्तब्ध झाले होते. जिल्ह्यातील शिवसेनेचे फुटलेले दोन्ही आमदार आमच्या नशिबी आले आहेत. नांदगावमध्ये विरोधकांकडून गॅस शेगड्यांचे वितरण करून महिला मतदारांना आकर्षित केले जात आहे. परिणामी, सदस्य नोंदणीत अडचणी येतात. शेजारील येवल्यात नोंदणीला प्रतिसाद मिळत असताना निफाडमध्ये पक्षाची ताकद असूनही, नेतेमंडळींच्या दुर्लक्षामुळे फटका बसत असल्याची व्यथा पदाधिकार्‍यांनी मांडली. 10 वर्षांपासून चांदवड-देवळा मतदारसंघ काँग्रेसला सोडला जात असल्याने, दोन्ही तालुक्यांत पक्षाला मरगळ आल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखविली.

शिवसेनेतील 40 गद्दारांविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याउलट महाविकास आघाडीचा धर्म पाळल्याने जिल्ह्या-जिल्ह्यांत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून स्वागत केले जात आहे. मागील दोन वर्षांपेक्षा पक्षाला चांगले वातावरण असून, सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आपला पक्ष मोठा झाला आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी अजून प्रयत्न करावेत, अशा सूचना पाटील यांनी केल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षात सक्रिय असलेल्यांनाच तिकीटवाटप केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर व नितीन पवार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासह पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीला जिल्ह्यात चांगला ‘स्कोप’
नाशिकचे खासदार व नांदगावचे आमदार हे शिंदे गटात गेले आहेत. त्यांना मिळालेल्या खोक्यांमधून कितीही वस्तूंचे वाटप करू द्या. मात्र, जनता सुज्ञ आहे. उलट राष्ट्रवादीसाठी दोन्ही ठिकाणी चांगला ‘स्कोप’ आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करावा. केंद्र व राज्य सरकारच्या कामकाजाविरोधातील माहिती जनतेला द्यावी, अशा सूचना जयंत पाटील यांनी केल्या.

हेही वाचा :

Back to top button