जुन्नर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा | पुढारी

जुन्नर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकर्‍यांची शेती पंपांची वीज बिले माफ करण्यात यावी. कांद्याला प्रतिकिलो 25 रुपये हमीभाव देण्यात यावा या व अन्य मागण्यांकरिता शिवसेना जुन्नर तालुका, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाच्या वतीने तहसील कार्यालयावर गुरुवारी (दि. 22) मोर्चा काढण्यात आला.

जुन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, याकरिता शासनाकडे पाठपुरावा करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याकरिता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय असा काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये माजी आमदार बाळासाहेब दांगट, दिलीप बामणे, बबन थोरात, संभाजी तांबे, माऊली खंडागळे, बाबू पाटे, शाम पांडे, रमेश हांडे, रूपेश जगताप, बाबा परदेशी, विजया शिंदे, श्रद्धा कदम आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.

कांद्याला 5 रुपये प्रतिकिलोप्रमाणे अनुदान देण्यात यावे. कर्जाला व नापिकीला कंटाळून तालुक्यातील वडगाव आनंद येथील दशरथ केदारी या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा कुटुंबाला 10 लाखांची मदत शासनाने द्यावी. बागायती पिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये, तर जिरायती पिकांसाठी हेक्टरी 60 हजारांची मदत देण्यात यावी. शेतकर्‍यांच्या कर्जावरील व्याज माफ करून कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन जुन्नरच्या तहसीलदार यांना मोर्चाच्या वतीने देण्यात आले.

Back to top button