Haryana crisis | हरियाणातील नायबसिंह सैनी सरकार अडचणीत; JJPची काँग्रेसला खुली ऑफर

Chief Minister of Haryana Nayab Singh Saini
Chief Minister of Haryana Nayab Singh Saini
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपच्या राजवटीत महागाई आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत तिघा अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. या तिघा आमदारांमध्ये सोमबीर सगवान, धरमपाल गोंदर आणि रणधीर गोलन यांचा समावेश आहे. या तिघांनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची भूमिकाही जाहीर केली. दरम्यान, देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) नेते आणि हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी बुधवारी काँग्रेसला नायबसिंह सैनी सरकार पाडण्याची खुली ऑफर दिली. दुष्यंत चौटाला यांनी हरियाणा सरकारबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्या भाजप सरकार अल्पमतात आहे. सरकार पडले तर काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

अनेक आमदार सरकारच्या संपर्कात- खट्टर

दरम्यान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी सांगितले की, काही आमदारांनी नायबसिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट अनेक आमदार सरकारच्या संपर्कात असल्याचाही दावा त्यांनी केला.

खट्टर पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, "निवडणुकीच्या दरम्यान कोण कुठे जात आहे? याचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. अनेक आमदारही आमच्या संपर्कात आहेत. अनेक नेते आमच्या समर्थनार्थ आहेत. त्यांनी त्यांच्या नेत्यांना सुरक्षित ठेवावे. किती आमदार आमच्या संपर्कात आहेत हे लवकरच कळेल."

खट्टर लोकसभेच्या रिंगणात

खट्टर हे कर्नाल येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. भाजप हरियाणातील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला आहे. "येथे शेकडो लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये या भागात भाजपचा विजय झाला आहे. यावेळी आम्ही गेल्या वेळेपेक्षा अधिक मतफरकाने विजय मिळवू," असे खट्टर म्हणाले.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

दरम्यान, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंह हुड्डा यांनी राज्यात तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि विधानसभेच्या लवकर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, जननायक जनता पक्ष (जेजेपी) नेते दिग्विजय सिंह चौटाला यांनी म्हटले की, हुड्डा यांनी आता लोकांचा विश्वास गमावलेल्या सरकारला पाडण्यासाठी तयारी सुरू करावी. हुड्डा यांनी तत्त्काळ राज्यपालांना भेटून परिस्थितीची माहिती द्यावी, असेही ते म्हणाले.

काँग्रेसने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, तीन आमदारांनी आधीच राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. दरम्यान, हरियाणात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

नायबसिंह सैनी सरकारकडे २ आमदार कमी

९० सदस्यांच्या सभागृहात सध्याचे एकूण संख्याबळ ८८ आहे. दोन जागा रिक्त आहेत. हरियाणा विधानसभा वेबसाइटच्या माहितीनुसार, विधानसभेत भाजपचे ४०, काँग्रेसचे ३०, दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीकडे १० आणि अपक्ष ७, इंडियन नॅशनल लोक दल आणि एचएलपी यांच्याकडे प्रत्येकी १ आमदार आहे. इतर दोन अपक्षांचा पाठिंबा असलेल्या नायबसिंह सैनी सरकारला हरियाणा विधानसभेत बहुमतासाठी आणखी दोन आमदारांची गरज आहे.

 नायबसिंह सैनी सरकारने बहुमत गमावल्याचा विरोधकांचा दावा

नायबसिंह सैनी यांच्या सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. भाजपला याआधी जेजेपी आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा होता. पण जेजेपीने पाठिंबा काढून घेतला आहे. आता अपक्ष आमदारांनीही सरकारची सोथ सोडून दिली असल्याचे हरियाणा काँग्रेस समितीचे अध्यक्ष उदय भान यांनी म्हटले आहे.

यावर्षी मार्च महिन्यात मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर कुरुक्षेत्रचे भाजप खासदार नायबसिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

हरियाणातील पक्षीय बलाबल

  • एकूण ९० जागा
  • भाजप ४०
  • काँग्रेस ३०
  • जेजेपी १०
  • अपक्ष ७
  • इंडियन नॅशनल लोक दल १
  • एचएलपी १

हरियाणा विधानसभेत सध्या काँग्रेसचे ३० आमदार आहेत. ज्यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्या तीन आमदारांच्या पाठिंब्याने त्यांचे संख्याबळ ३३ वर पोहोचले आहे. पण बहुमतासाठी त्यांच्याकडे १३ आमदार कमी आहेत.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news