उपवासाला बनवला जाणारा सहज आणि सोपा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी हा एक अतिशय लोकप्रिय महाराष्ट्रीयन उपवासाचा खाद्यपदार्थ आहे. चला तर पाहूयात उपलब्ध साहित्यात सहज आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची उपवासाची मऊ, लुसलुशित साबुदाणा खिचडी…
• १ कप साबुदाणा / साबुदाणा दाणे
• १ चमचा तूप
• १/२ टीस्पून जिरे
• २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• भाजलेले शेंगदाण्याचे कूट
• चवीनुसार मीठ
• चिमूटभर साखर
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• साबुदाणा ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
• स्वच्छ धुतलेल्या साबुदाण्यात बुडेपर्यंत पाणी ओतून तो एक ते दीड तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून टाका. यानंतर रात्रभर साबुदाणा भिजवा.
• सकाळी जर तुम्हाला साबुदाणा कोरडा वाटला तर चमच्याने हलवा किंवा 2-3 चमचे पुन्हा पाणी घाला.
साबुदाणा नीट मिक्स करून बाजूला ठेवा
• स्वच्छ कढई घेऊन, कढई हलकीशी गरम करा.
• कढईमध्ये तूप टाकून ते गरम करून घ्या. यानंतर कढवलेल्या तुपात जिरे टाकून ते चांगले फुलू द्या.
• यानंतरची कृती करताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवा.
• कढईमध्ये चिरलेली हिरवी मिरची, भिजवलेला साबुदाणा, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. यानंतर मध्यम आचेवर ३-४ मिनिटे साबुदाणा हे मिश्रण झाकूण ठेवावे. यावेळी साबुदाणा चांगला फुलू द्यावा.
• यानंतर यावरील झाकण काढून साबुदाणा चांगला मिक्स करून घ्या.
• सजावटीसाठी वरून चिरलेली कोथिंबीर घाला आणि साबुदाणा खिचडी चांगली मिक्स करून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता.
• मस्त मऊ, लुसलुशित तयार झालेली खिचडी दह्याबरोबर खाऊ शकता.