सोलापूर : श्रीकांत देशमुख यांची आज पोलिस ठाण्यात हजेरी | पुढारी

सोलापूर : श्रीकांत देशमुख यांची आज पोलिस ठाण्यात हजेरी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा लग्‍नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल असून, तो सदर बझार पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला आहे. याप्रकरणी त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. यात अंतरिम जामीन मंजूर करीत देशमुख यांना तपासासाठी आजपासून (दि. 26) दोन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हे आदेश दिले आहेत.

मुंबई येथील एका महिलेने अर्जदार श्रीकांत देशमुख यांनी त्यांना लग्‍नाचे आमिष दाखवून मुंबई, सोलापूर, पुणे, सांगली आदी ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. मात्र, लग्‍न केले नाही, अशा आशयाची फिर्याद संबंधित महिलेने प्रथमत: पुणे येथील डेक्‍कन जिमखाना पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार हा गुन्हा सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे. याप्रकरणी पोलीस श्रीकांत देशमुख यांना अटक करण्याच्या मागावर होते. त्यामुळे देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायाधीश शिरभाते यांनी श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश दिले. मात्र तपासासाठी पोलीस ठाण्यात 26 आणि 27 जुलै रोजी हजेरी देण्याचे आदेश दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 28 जुलैरोजी होणार आहे.

Back to top button