पंढरपूर : चंद्रभागेत बुडून नागपूरच्या दोन भाविकांचा मृत्यू | पुढारी

पंढरपूर : चंद्रभागेत बुडून नागपूरच्या दोन भाविकांचा मृत्यू

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या पात्रात स्नान करताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना जुन्या दगडी पूलाजवळ घडली.

सचिन शिवाजी कुंभारे (वय २५, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर) व विजय सिद्धार्थ सरदार (वय 30, नारशिंगी, पो. भारशिंगी, ता. नरखेड, जि. नागपूर) अशी मयत तरुण भाविकांची नावे आहेत.

जलालखेड येथून युवक आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपूरला पोहचले. आधी अंघोळ करावी व नंतर विठ्ठलाचे दर्शन घ्यावे असे या मित्रांनी ठरवले. आणि ठरल्याप्रमाणे दोघे अंघोळीसाठी नदी पात्रात गेले. नदीला पाणी जास्त असल्याने सचिनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवायला गेलेला विजयसुद्धा पाण्यात बुडू लागला.

दोघेही वाहून जाताना उपस्थित भाविकांना दिसले. भाविकांनी नदी पत्रात उतरून दोघांनाही बाहेर काढले. त्‍यांना तात्‍काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादम्‍यान दोघांचाही मृत्‍यु झाला.

हेही वाचा  

Back to top button