सत्येंद्र जैन यांच्या निकटवर्तीयांकडे सापडले घबाड! १३३ सोन्याच्‍या नाण्‍यांसह २.८२ कोटींची रोकड जप्त | पुढारी

सत्येंद्र जैन यांच्या निकटवर्तीयांकडे सापडले घबाड! १३३ सोन्याच्‍या नाण्‍यांसह २.८२ कोटींची रोकड जप्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्‍लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) आज जैन यांच्‍यासह त्‍यांच्‍या निकटवर्तीयांच्‍या मालमत्तांवर छापे टाकले. या कारवाईत तब्‍बल १३३ सोन्याच्‍या नाण्‍यांसह २.८२ कोटी रोकड जप्त करण्‍यात आली आहे.  या संपत्तीची माहिती घेण्‍याचे काम सुरु असून, या कारवाईमुळे सत्येंद्र जैन  यांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ने   ३० मे रोजी सत्येंद्र जैन यांना अटक केली हाेती. न्‍यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे.

ईडीने एप्रिलमध्ये जैन यांच्या कुटुंबाची 4.81 कोटी रुपयांच्‍या मालमत्ता जप्‍त केली हाेती. ‘पीएमएलए’ अंतर्गत अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इन्फोसोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेजे आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्‍यांवरही कारवाई करत सत्‍येंद्र जैन यांच्‍या कुटुंबातील वैभव जैन यांच्‍या पत्‍नी स्‍वाती जैन, अजित प्रसाद जैन यांच्‍या पत्‍नी सुशीला जैन आणि सुनील जैन यांच्‍या पत्‍नी इंदु जैन यांच्‍या संबंधित सर्व स्‍थावर मालमत्ता जप्‍त करण्‍याचे आदेश ईडीने दिले आहेत.

जैन हे 2015 ते 2016 दरम्यान आमदार हाेते. या काळात  त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांना शेल कंपन्यांकडून कोलकातामधील एंट्री ऑपरेटर्सच्‍या माध्‍यमातून 4.81 कोटी रुपयांचे हस्‍तांतर झाल्‍याचेही  ईडीच्या तपासात समोर आले आहे. आता सत्येंद्र जैन यांच्‍या निकटवर्तींयांकडे माेठ्या प्रमाणावर साेने नाणी आणि राेकड सापडल्‍याने आम आदमी पार्टीमध्‍ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा  

Back to top button