परभणी : मापा येथे विवाहितेची विषारी औषध पिऊन आत्महत्या | पुढारी

परभणी : मापा येथे विवाहितेची विषारी औषध पिऊन आत्महत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मापा येथील एका विवाहित महिलेने सासरकडील मंडळीकडून होणा-या पैशाच्या मागणीसाठी व शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून ७ मे रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर विवाहितेची मृत्यूशी चाललेली ७ दिवसांची झुंज शेवटी अपयशी ठरली. उपचारादरम्यान १३ मे रोजी ऋषीज्ञा ठोंबरे या विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडीलांनी चारठाणा पोलीस ठाण्यात १५ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासु व सासरा या तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला.

याबाबतची माहिती अशी की, बाबासाहेब तारे रा.कोल्हा यांनी आपली मुलगी ऋषीज्ञा हिचा विवाह १४ मे २०२० रोजी सेलू तालुक्यातील मापा येथील कृष्णा रामदास ठोंबरे यांचेशी करून दिला. यावेळी हुंडा म्हणून चार लाख रूपये व २ तोळे सोने दिले होते. सासरकडील मंडळीने ऋषीज्ञाचे नाव बदलुन राधीका ठेवले होते. कृष्णा ठोंबरे एचडीएफसी पुणे येथे फायनन्स विभागात घरी बसुन आँनलाईन काम करीत होते. त्यांना अकरा महीन्यापूर्वी श्रुती ही मुलगी झाली. सहा महीन्यापुर्वी कृष्णा ठोंबरे याने आपले काम सोडुन दिले. त्यानंतर ते पत्नी व मुलीला घेऊन कोल्हा येथे आले. त्यावेळी कृष्णा यांनी व्यवसायासाठी चार लाख रुपये व तुमची आर्धी जमीन माझ्या नावे करुन द्या अशी मागणी केली. या मागणीनंतर रोख रक्कम ६० हजार रूपये दिले होते. तेव्हापासून पती कृष्णा ठोंबरे, सासरा रामदास ठोंबरे व सासु मिरा ठोंबरे ह्यांनी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली.

त्यानंतर काही दिवसांनी कृष्णा ठोंबरे यांनी पत्नी व मुलीला कोल्हा येथे आणुन सोडले. ८ दिवसांपूर्वी मध्यस्थी नातेवाईकांसोबत चर्चा करून ऋषीज्ञा हिला मुलीसह परत सासरी मापा येथे आणुन सोडले. ८ मे रोजी व्याही रामदास ठोंबरे यांनी मला फोन करून ऋषीज्ञा हिचे पोट दुखत आहे तीला परभणी येथे दवाखान्यात आणले असे सांगितले. मी व माझी पत्नी रत्नमाला तारे तातडीने दवाखान्यात जावून मुलगी ऋषीज्ञा उर्फ राधीका हिची भेट घेतली. यावेळी तीने सांगितले की, पती कृष्णा ठोंबरे, सासरा रामदास ठोंबरे व सासु मिरा ठोंबरे यांनी व्यवसाया करिता माहेरच्यांकडून पैसे घेऊन का आली नाहीस, त्यांची आर्धी जमीन नावे का करून घेत नाहीस असे म्हणत मला शिवीगाळ करत मारहाण केली. म्हणून मी या नेहमीच्या त्रासाला कंटाळून ७ मे रोजी दुपारी २ वा. घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध घेतले. ऋषीज्ञाची प्रकृती अधिक खालावत असल्याने तिला मी पुढील उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात ११ मे रोजी आणले. उपचार चालू असतांना १३ मे रोजी रात्री ८:३० वा. ती निधन पावली.

१४ मे रोजी मापा येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर विवाहितेचे वडील बाबासाहेब तारे यांनी १५ मे रोजी चारठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून तिघांविरूध्द रात्री उशीरा कलम ३०४(ब), ४९८ (अ), ३२३, ५०४, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. स.पो.नि. बालाजी गायकवाड हे तपास करत आहे.

हेही वाचा

Back to top button