मुंबई : मातोश्रीसमोर शनिवारी करणार हनुमान चालिसा पठण; राणा दांपत्याचा निर्धार | पुढारी

मुंबई : मातोश्रीसमोर शनिवारी करणार हनुमान चालिसा पठण; राणा दांपत्याचा निर्धार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मातोश्री समोर हनुमान चालिस पठण करण्यावर आम्ही ठाम असून, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आम्ही उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना रवी राणा म्हणाले, हिंदुत्त्वावर मतं घेऊनच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण आज याच बाळासाहेबांनी शिकवलेल्या  हिंदुत्तवाचा त्यांना विसर पडला आहे. मुख्यमंत्र्यांचे आत्ताचे विचार हे बाळासाहेबांच्या विचारांना भगदाड पाडणारे आहेत. हनुमान चालिसा पठण करण्यामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नाही.  मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसाचं पठण करावे, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. म्हणून आम्ही उद्या सकाळी ९ वाजता पोलिसांना सहकार्य करत, शांततेने मातोश्री समोर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे, रवी राणा यांनी सांगितले.

नवनीत राणा म्हणाल्या, वीज टंचाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ठाकरे सरकार काहीच बोलत नाही. महाविकास आघाडीच्या काळाताच महाराष्ट्रावर अनेक संकटे येत आहेत. संकटांची ही मालिका दूर करण्यासाठीच आम्ही चालिसा पठण करणार आहोत. मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीच आपले विचार बदलले नाहीत, पण आज हे सरकार आपले मूळ विचारच बदलत आहे. मोदींचे फोटो लावून शिवसेनेने निवडणूक लढली आहे. पण आज त्यांना याचा विसर पडला आहे. राज्यासमोर संकटे दूर व्हावी म्हणून हनुमान चालिसाचं पठण करत आहोत, असे त्या म्हणाल्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना ‘ संजय राऊत म्हणजे, पोपटच’ असे टीकास्त्र नवनीत राणांनी त्यांच्यावर सोडले.

राणा दाम्पत्यांचे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे प्रयत्न : महापौर किशोरी पेडणेकर

महाराष्ट्रात दंगली घडवायच्या हाच राणा दाम्पत्यांचा हेतू असल्याचा, आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. आम्हाला भाजपसोबत जोडू नका, या आंदोलनाला फडणवीसांची फूस असल्याचेही त्या म्हणाल्या. याप्रकरणी मातोश्री बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली असून महापौर किशोरी पेडणेकरही याठिकाणी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button