पंढरपूर : तब्बल दोन वर्षांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरु | पुढारी

पंढरपूर : तब्बल दोन वर्षांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरु

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे बंद असलेले श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने पुन्हा सुरू करण्यात आले. आज मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर तब्बल दोन वर्षांनी पदस्पर्श दर्शन मिळाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मात्र मास्कची सक्ती करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात यावे अशी मागणी भविकांमधून वारंवार होत होती. तर मंदिर समितीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पदस्पर्श दर्शन सुरू करण्यासाठी उत्सुक होती, याकरिता राज्य शासनाकडे प्रस्तावही पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. दरम्यान, १ एप्रिल पासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येताच, दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंदिर समितीला आणि भाविकांना राज्यशानाने ठरवून दिलेल्या मास्क सक्तीचा अवलंब करावा लागणार आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाचा मुहूर्त साधत, मंदिर समितीने श्री चे पदस्पर्श दर्शन सुरु केले आहे. शनिवारी सकाळी ६ वाजता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनी नाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, व्यवस्था पक बालाजी पुदलवाड यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले. यामुळे भाविक भारावून गेले. गुढीपाडवा निमित्ताने मंदिरात व श्रींच्या गाभाऱ्यात आकर्षक पाना फुलांची व फळांची आरास करण्यात आल्याने, मंदिर अधिकच खुलून दिसत आहे. तर आरास पाहून भाविक मनोमनी सुखावत आहेत.

आता पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने भाविकांना श्रींच्या पायावर डोके ठेवून नतमस्तक होता येणार आहे. तर श्रींच्या करिता भाविकांना तुळशी हार ही मंदिरात नेता येणार आहेत. त्यामुळे हार विक्रेते, प्रासादिक साहित्य विक्रेते देखील आनंद व्यक्त करत आहेत. पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. तर आज शनिवार गुढीपाडवा तर उद्या रविवार असल्याने विकेंडला भाविकांची गर्दी होण्याची शक्यताही समितीकडून व्यक्त केली आहे. मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी दर्शन सुविधा उपलब्ध केली आहे.

राज्य शासनाने भाविकांची व मंदिर समितीची पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची मागणी मान्य केली. पदस्पर्श दर्शनासाठी आसुसलेला भाविक समाधान व्यक्त करत आहे. मात्र मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांना मास्क वापरावा लागणार आहे. भाविकांनी नियमांचे पालन करावे व सहकार्य करावे.

– गहिनी नाथ महाराज, औसेकर, सह अध्यक्ष

Back to top button