पुढील ४-५ वर्षात भारतात १० लाख नोकऱ्यांची निर्मिती; शेफ आणि योग प्रशिक्षकांना मोठी संधी! | पुढारी

पुढील ४-५ वर्षात भारतात १० लाख नोकऱ्यांची निर्मिती; शेफ आणि योग प्रशिक्षकांना मोठी संधी!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज शनिवारी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (India-Australia Economic Cooperation and Trade Agreement) झाला. यामुळे ऑस्ट्रेलियातील बाजारपेठेत भारतीय कापड, लेदर, दागिने आणि क्रीडा सारख्या ९५ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन तेहान यांच्या उपस्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार झाला. व्हर्च्युअल माध्यमातून हा कार्यक्रम झाला.

यामुळे पुढील ४-५ वर्षात भारतात १० लाख नोकऱ्यांची निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात भारतीय शेफ आणि योग प्रशिक्षकांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होतील. आम्ही भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शिक्षण संस्थांच्या सहकार्यावरही चर्चा केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

ऑस्ट्रेलियात १ लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. आम्ही पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्क आणि हॉलिडे व्हिसा देण्यावर विचार करत आहोत. भारतीय विद्यार्थ्यांसाठी २ आणि ४ वर्षांदरम्यानचा पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा उपलब्ध करुन देणार असल्याचेही पीयूष गोयल यांनी सांगितले.

आम्ही व्यापारातील अडथळे दूर करत आहोत. ज्यामुळे भविष्यात व्यापार दुपटीने वाढेल. ज्यामध्ये कामगार केंद्रीत क्षेत्रांसाठी मोठी क्षमता असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार २७ अब्ज डॉलरवरून पुढील ५ वर्षात ४५-५० अब्ज डॉलर पर्यंत जाईल, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button