सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडेंच्या बंगल्यातून १३ लाखांचे दागिने चोरीला

सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडेंच्या बंगल्यातून १३ लाखांचे दागिने चोरीला

बारामती: पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव मुगुटराव काकडे यांच्या निंबुत (ता. बारामती) येथील बंगल्यातून सुमारे १३ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी अज्ञातांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

गौतम शहाजीराव काकडे यांनी याबाबत फिर्याद दिली. गौतम हे कुटुंबियांसह २१ ते २३ मे दरम्यान सहलीवर गेले असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी २७ मे रोजी फिर्य़ाद दाखल केली आहे. फिर्यादीच्या घरी त्यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक कृष्णराव देशमुख हे एकत्रित राहतात. गेल्या दहा वर्षांपासून एक दांपत्य त्यांच्याकडे स्वयंपाक व घरातील काम करते. तर देशमुख यांच्या देखभालीचे काम एक मुलगा करतो. गेल्या महिन्यात फिर्यादीचे वडील शहाजीराव काकडे यांच्या बेडरुममधील लाकडी कपाटातून फिर्य़ादीची आई व पत्नीचे दोन तोळ्याची सोन्याची बांगडी व एक अंगठी असे एक लाखाचे दागिने चोरीला गेले होते. परंतु त्याबाबत त्यांनी फिर्य़ाद दाखल केली नव्हती. दरम्यान फिर्यादीची बहीण सुट्टीसाठी माहेरी आली असताना त्यांच्या कामासाठी त्यांच्यासोबत एक महिला कामगारही आली होती.

दरम्यान १७ मे रोजी शहाजीराव काकडे यांच्या बेडरुममधील लाकडी कपाटातून लाॅकर व कपाटाच्या चाव्या गायब झाल्या होत्या. त्यामुळे बेडरुममधून बाहेर पडताना दरवाजा बंद करण्याची दक्षता घेतली जात होती. २१ मे रोजी फिर्यादी हे कुटुंबियांसह पहाटे सहलीला गेले. यावेळी शहाजीराव काकडे व नातेवाईक देशमुख हे घरी होते. कामगारही तेथेच होते. २३ रोजी ते सहलीवरून परतल्या नंतर २४ रोजी फिर्य़ादीच्या आईने त्यांच्याकडील चावीने लाॅकर उघडला असता सहलीला जाताना ठेवलेले दागिने आढळून आले नाहीत.

कामगारांकडे विचारपूस केली असता त्यांनीही या प्रकाराबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. या घटनेत एक लाख रुपयांची दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी, १ लाख रुपयांची अंगठी, पाच लाख रुपयांच्या दहा तोळ्याच्या पाटल्या, ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे कंगन, ३ लाख रुपयांच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या असा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.

https://youtu.be/m5yyfqkYqY4

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news