ओडिशा : निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांनी घेतली 'सरपंच' उमेदवारांची परीक्षा | पुढारी

ओडिशा : निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांनी घेतली 'सरपंच' उमेदवारांची परीक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील मालुपाडा गावात ग्राम पंचायत निवडणुकीपूर्वी ग्रामस्‍थांनी सरपंच पदासाठी उभारलेल्‍या उमेदवारांसाठी “तोंडी आणि लेखी प्रवेश परीक्षा” घेतली.  या ग्रामपंचायतीसाठी १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या बाबात एका उमेदवाराने सांगितले की, सरपंच पदासाठीचे ९ उमेदवार होते. या सर्वांना स्थानिक शाळेच्या आवारात जाहीर सभेसाठी बोलावण्यात आले होते. तिथे त्‍यांना या परीक्षेबाबत कल्‍पना देण्यात आली.

सरपंच पदासाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार या सभेत सहभागी झाले.  त्यांनी ही ‘प्रवेश परीक्षा’ दिली. या संदर्भात एका उमेदवाराने सांगितले की, निवडणूक कशासाठी लढवत आहात?, सरपंच पदाचा उमेदवार म्हणून तुमची पाच ध्येये काेणती? कोणत्या कल्याणकारी कामांमध्ये तुमचा सहभाग आहे? असे प्रश्न या परीक्षेमध्‍ये विचारण्यात आले होते. याशिवाय त्यांच्याकडून ग्रामपंचायतीतील गावे आणि वाड्यांबाबतही माहिती मागविण्यात आल्याचे उमेदवाराने सांगितले. या परीक्षेचा निकाल १७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याचे ग्रामस्‍थांनी सांगितले.

यासंदर्भात निवडणूक अधिकारी रबिंदा सेठी यांनी सांगितले की, या परिक्षेबाबत कोणतीही अधिकृत तरतूद केलेली नाही. याबाबत अद्याप कोणीही तक्रारही दाखल केलेली नाही. यासंदर्भात कोणी तक्रार दाखल केली तर आम्ही चौकशी करू., असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. ओडिशामध्‍ये 16 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत पाच टप्प्यात ग्राम पंचायत निवडणुका होणार आहेत.  त्यामध्ये 2.79 कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान मतमोजणी होणार आहे.

हे ही वाचलं का 

Back to top button