Landslide in Manipur : मणिपूरमध्ये मुसळधार पावसाने भूस्खलन; महामार्ग ठप्प, 500 ट्रक अडकले
पुढारी ऑनलाइन डेस्क : Landslide in Manipur : मणिपूरला मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे इम्फाळ-सिलचर महामार्ग रोखला गेला असून 500 मालवाहू वाहने अडकून पडली, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे.
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, बुधवारी राष्ट्रीय महामार्ग 37 वर इरांग आणि अवांगखुल भाग 2, खोंगसांग आणि अवांगखुल आणि रंगखुई गावादरम्यान भूस्खलन झाले. अद्यापतरी कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, रस्ता मोकळा करण्याचे आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलनाचे प्रकार घडले, असे ते म्हणाले. दरड कोसळल्यामुळे किमान 500 मालवाहू वाहने महामार्गाच्या विविध भागात अडकून पडली आहेत.
Landslide in Manipur : गेल्या वर्षी झालेल्या भूस्खलनात 61 जणांचा मृत्यू
गेल्या वर्षी मणिपूरमध्ये जून महिन्यात जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन किमान ६१ जणांचा मृत्यू झाला होता. 30 जून रोजी जिरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्गाच्या तुपुल रेल्वे यार्ड बांधकाम साइटवर भूस्खलन झाले होते.
Landslide in Manipur : जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम
भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. तब्बल 500 मालवाहू गाड्या राष्ट्रीय महामार्गांवर अडकल्या आहेत. परिणामी मणिपूरमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे मे महिन्यापासून राज्यात उफाळलेल्या हिंसाचारामुळे देखील अनेक वेळा रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. त्याचाही परिणाम मालवाहतुकीवर झाला होता. परिणामी मणिपूरमध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
Landslide in Manipur : मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर नैसर्गिक आपत्ती
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून दोन समुदायांमध्ये संघर्ष उफाळून आला. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. दंगलींमध्ये 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच या हिंसाचारादरम्यान मणिपूरमध्ये महिलांवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसलळी. या घटनांचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला.
दरम्यान, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधून शांततेच्या वार्ता येत आहेत, असे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.
त्यामुळे हिंसाचारानंतर काही दिवसांपासून शांतता प्रस्थापित होत असतानाच मणिपूरमध्ये मुसळधार पावसाने भूस्खलन झाले आहे. त्यामुळे मणिपूरला आता नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे.
हे ही वाचा :
- Ghulam Nabi azad : 'सर्व मुसलमान पूर्वी हिंदूच होते', गुलाम नबी आझाद यांचा दावा
- Hindi films in Manipur : मणिपूरवासियांनी २३ वर्षांनंतर पाहिला हिंदी चित्रपट; बॉलिवूडचा आनंद घेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष
- PM Modi on Manipur : मणिपूरमध्ये आता शांतता प्रस्थापित होत आहे – PM मोदी
- Sharad Pawar : मणिपूर विषयावर केंद्र सरकार लक्ष देत नसेल तर देशासाठी चिंतेची बाब : खा. शरद पवार

