

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महामारीमुळे सुमारे दोन वर्षे बंद असणारा फुटबॉल हंगाम काही दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने कोल्हापूरसह १४ जिल्हे निर्बंधमुक्त केले आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रही पूर्णक्षमतेने सुरु झाल्याने फुटबॉल सामनेही सर्वांना पाहण्यास खुले करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आज पहिल्या दिवसापासूनच फुटबॉल प्रेमी छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये एकवटू लागल्याचे चित्र आहे.
कोरोनाचा कहर कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध शिथील केले आहेत. यामुळे नाट्यगृहे, सिनेमागृहे, मॉल्स, पर्यटन व धार्मिक स्थळे, हॉटेल्स, बार, स्पोर्टस् कॉम्पलेक्स, स्विमींग पूल, जीम-स्पा पूर्ण क्षमतेने सुरु राहाणार आहेत. लोकांना केवळ मास्क व सोशल डिस्टन्सींगची सक्ती कायम ठेवली आहे.
दरम्यान, कोल्हापूरकरांची अस्मिता असणारा फुटबॉल हंगाम सुमारे दोन वर्षांनी विनाप्रेक्षक सुरु करण्यात आला होता. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु असणारे सामने फुटबॉलप्रेमींना पाहता यावे यासाठी ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष सामने पाहता येत नसल्याने फुटबॉलप्रेमी अक्षरश: बेचैन होते.
लहान मुले तर स्टेडियमच्या सभोवती असणाऱ्या लहान-लहान झरोक्यातून सामने पाहण्यासाठी कसरत करताना दिसत होते. अखेर प्रशासनाच्या सुचनेनुसार कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए) ने फुटबॉल सामने पाहण्यास खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तमाम फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केएसएच्या निर्णयाचे स्वागत करून याबाबतची माहिती सोशल मिडीयावरून व्हारल केली जात आहे.
हे ही वाचलं का ?