कोल्हापूरसह 14 जिल्हे निर्बंधमुक्त | पुढारी

कोल्हापूरसह 14 जिल्हे निर्बंधमुक्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरसह राज्यातील 14 जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने तेथील निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. राज्य सरकारने त्याबाबतची नवी नियमावली बुधवारी जाहीर केली. निर्बंधमुक्त जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांत नाट्यगृहे, सिनेमागृहे, मॉल्स, पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे, हॉटेल्स, बार, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, जीम, स्पा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. याशिवाय सरकारी, खासगी कार्यालयांसह सर्व उद्योग-व्यवसायही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक राहणार आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून नव्या नियमावलीची अंमलबजावणी होईल. 100 टक्के क्षमतेने कामकाज सुरू करण्यासाठी संपूर्ण लसीकरणाची अट ठेवली आहे. उर्वरित ‘ब’ श्रेणीतील 22 जिल्ह्यांत 50 टक्के क्षमतेची अट व निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत कायम राहतील, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात 20 डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागताच राज्य सरकारने 8 जानेवारीपासून राज्यात कडक निर्बंध लादले. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रथम मुंबईतील, नंतर हळूहळू राज्यातील रुग्णसंख्या घटत गेली.

मात्र, 16 ते 17 जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दर हा 15 टक्क्यांपेक्षा अधिक होता. त्यामुळे राज्य सरकारने कोणताही धोका न पत्करता फेब्रुवारीअखेरपर्यंत राज्यात 50 टक्के क्षमतेचे निर्बंध व अट कायम ठेवली होती. फेब्रुवारीअखेर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध हटविले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 10 फेब्रुवारीलाच सांगितले होते. त्यानुसार मागील आठवड्यात आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि राज्य कार्यकारिणी समितीने राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी राज्यातील घटलेली रुग्णसंख्या पाहता निर्बंध हटविण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14 जिल्ह्यांतील संपूर्ण निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला.

‘अ’ श्रेणीतील जिल्ह्यांत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, शैक्षणिक कार्यक्रमांना हॉल अथवा मैदाने पूर्ण क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा, कॉलेजचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेने अंगणवाडी, शिशू वर्ग सुरू करता येतील. होम डिलिव्हरी सेवा सुरू करण्याची परवानगीही त्यांना मिळाली आहे.उर्वरित 22 जिल्ह्यांचा समावेश ‘ब’ श्रेणीत आहे. तेथे नाट्यगृहे, सिनेमागृहे, मॉल्स, पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे, हॉटेल्स, बार, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, जीम, स्पा सेंटर आदी 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

निर्बंधमुक्तीचे निकष : पहिला डोस 90 टक्के, तर दुसरा डोस 70 टक्के

निर्बंधांत 100 टक्के सूट देण्यात आलेल्या 14 जिल्ह्यांतील 90 टक्क्यांहून अधिक नागरिकांना पहिला डोस, तर 70 टक्क्यांहून अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. सोबतच, या सर्व जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. 60 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन व आयसीयू बेड रिकामे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांचा समावेश ‘अ’ श्रेणीत केला आहे.

Back to top button