

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kapil Dev Criticism Rohit : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित शर्माला लाज वाटली पाहिजे. त्याने फिटनेसच्या बाबतीत निदान त्याचा संघ सहकारी विराट कोहलीकडून काहीतरी शिकावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत मांडले.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ज्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून पराभव केला. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी यशस्वी पाऊल टाकले आहे.
पण कपिल देव यांनी त्याच्या फिटनेसवर निशाणा साधला आहे. रोहितच्या फिटनेसबद्दल विचारले असता त्यांनी, रोहित हा ओव्हरवेट झाला आहे. त्याला वजन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. कर्णधारासाठी इतर अनेक गोष्टींबरोबरच तो तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही फिट नसणे ही लाजिरवाणी गोष्ट असते. त्यामुळे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोहित शर्माला खूप मेहनत घ्यावी लागेल, असा सल्ला त्यांनी दिला. (Kapil Dev Criticism Rohit)
तो एक महान फलंदाज आहे. उत्तम कर्णधार आहे. पण जेव्हा फिटनेसचा विचार केला जातो तेव्हा तो टीव्हीवर थोडा जास्त वजनदार दिसतो. तो तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. तुम्ही विराट कोहलीच्या फिटनेसकडे बघा. त्याच्याकडून शिकू शकता. त्याला बघातच सर्व जण म्हणात की 'फिटनेस असावा तर असा', असेही कपिल देव यांनी मत व्यक्त केले. (Kapil Dev Criticism Rohit)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून रोहित शर्माचे तब्बल 11 महिन्यांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तो गेल्या वर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा खेळला होता. त्यानंतर बोटाच्या दुखापतीमुळे आणि कोरोनाची लागण झाल्याने तो बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून बाहेर पडला होता.