

पुढारी ऑनलाईन डेस्क: दोघांच्या लग्नात भटजी अडथळा ठरत असेल, तर पळून जाऊन लग्न करणे, हाच पर्याय असतो. आम्हाला कुणाचही वावडं नाही. भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येथ 'इंडिया' आघाडी निर्माण केली आहे. आघाडीत सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत नेत्यांनी केले आहे. आघाडीत सामील झाल्यानंतर धोरणानुसार काम करावे लागणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर पलटवार केला.
वंचित बहुजन आघाडीचा 'इंडिया' आघाडीत अद्याप समावेश झालेला नाही. वंचित आघाडी आणि ठाकरे गट यांची युती झाली असली तरी महाविकास आघाडीत अद्याप वंचित आघाडीला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे वंचितला शिवसेनेबरोबर जागा वाटप करण्यात अडचणी येत आहेत. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली आहे, पण लग्नाची तारीख अजून काढलेली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत, तोपर्यंत आमचे लग्न होणार नाही. त्यामुळे आम्हाला थांबावे लागत आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले होते. यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आंबेडकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
पाटील म्हणाले की, भाजपविरोधात महाराष्ट्रात सर्वजण एकत्रित आल्यास निश्चितच फायदा होणार आहे. आंबेडकर यांची भूमिका सकारात्मक असेल तर स्वागत करतो. सर्वांनीच एकत्र आले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कुणाला डावलणे, ही आमची आणि काँग्रेसची भूमिका नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा