सांगलीत जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

सांगलीत जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
Published on
Updated on

 सांगली : सांगली जिल्ह्याच्या राजकारणाकडे वळून पाहताना दिसते की, काँग्रेसला संपविण्यासाठी जयंत पाटील यांनी जिद्दीने प्रयत्न केले. स्थानिक संस्थांच्या निवडणुका असोत की, आमदार, खासदारकीच्या. आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील घराण्यास मानाचे स्थान. भक्तांचे काय करायचे? सनातन प्रश्न. काँग्रेस म्हणजेच दादा घराणे. कितीतरी वर्षे. आता ही वीण सैल झाली इतकेच. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात राजकीय वैमनस्य. ते पुढच्या पिढीनेही जोजवले. त्यामुळे झालेल्या चुकांची जाहीर कबुलीही देतात. सत्तेपासूनच दूर फेकले गेल्यानंतर पुन्हा अशा चुका न करण्याची ग्वाहीही देतात. 'पापी पेट का…'च्या धर्तीवर सवाल खुर्चीचा आहे.

असो. तर मागे पाहताना दिसते की, सांगली जिल्ह्यातून काँग्रेसला संपविण्यासाठी जयंत पाटील यांनी जिद्दीने प्रयत्न केले. स्थानिक संस्थांच्या निवडणुका असोत की, आमदार, खासदारकीच्या. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आता ते कोणती भूमिका घेतात ते पाहावे लागेल. यापूर्वी त्यांनी काँग्रेस संपविण्यासाठी भाजपला सहानुभूती दिली. पडद्यावर एक आणि पडद्यामागे दुसरीच भूमिका निभावली. भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी रसद पुरवली, ताकद खर्च केली. काँग्रेसशी ते सतत फटकून वागले. बदलत्या राजकीय नेपथ्यामध्ये ते भाजपशी फटकून वागतील आणि काँग्रेसला रसद पुरवतील, ताकद खर्च करतील का? या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालावेळी मिळेल. राजकीय नेपथ्यच बदलल्यामुळे त्यांना बेरजेचे राजकारण करावे लागेल, असे जाणकारांना वाटते.

काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर

काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट, शेतकरी संघटना, सर्व पुरोगामी संघटना, अन्य छोटे पक्ष, संस्था, संघटना आणि काही व्यक्तींनी एकीचा निर्धार केलेला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सांगलीत निर्धार मेळावा झाला. त्यात आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे सांगलीचे नेतृत्व दिले. काँग्रेसचे लोकसभेसाठीचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील, काँग्रेसचे शहर -जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींनी डॉ. कदम यांच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली. तेव्हापासून काँग्रेस सतत अ‍ॅक्शन मोडवरच राहिली आहे. काँग्रेस नेते लोकांमध्ये सतत आहेत. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी जिल्हा पिंजून काढला. मराठा मोर्चा यासारखे जाहीर कार्यक्रम असोत की, अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, घरगुती सण-समारंभ… काँग्रेस नेते हजेरी लावतात. सत्तेकडे जाण्याचे मार्ग लोकमानसातून जातात. मग लोकांच्याकडे जाणार नाहीत तर मग कोठे जाणार ?

या स्थितीत जयंत पाटील भाजपलाही जड जातील. भाजपमध्ये सध्या नाराजीनाट्य, मानापमानही रंगले आहे. तीस-पस्तीस वर्षे पक्षासाठी देऊन मला काय मिळाले? अशी जाहीर विचारणा जाहीर कार्यक्रमात संघाच्या मूळ कार्यकर्त्यांकडून होत आहे. मूळ संघाची मंडळी भाजपच्या सध्याच्या चेहर्‍यावर नाराज आहेत. 'डावलले' अशी त्यांची भावना आहे. यात आणखी भर पडली ती राष्ट्रवादी फुटल्यामुळे. अजित पवार गट अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक उंट भाजपच्या सत्तेच्या छावणीत आलेत. त्यांच्या विलक्षण ताकदीमुळेही भाजपमध्ये अस्वस्थता वाढली. उमेदवारीवरून तर्कवितर्क लढवणे इतकेच हाती उरते. कोणाची उमेदवारी निश्चित आहे, असे छातीठोकपणे कोणी सांगत नाहीत. भाजपचे सध्याचे खासदार संजय पाटील यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरचे प्रेमबंध भाजपवाल्यांना नेहमीच खटकत आलेत. त्याला अनेकवेळेला जाहीर तोंडही फुटले आहे. जयंत पाटील यांनीच संजय पाटील निवडून येण्यासाठी केलेली मदत उघड गुपित. तात्पर्य काय तर जयंत पाटील एकच भूमिका वठवणार का, हा आहे कळीचा मुद्दा.

अजित पवार गटाची बांधणी सुरू

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात फारशी ताकद नाही. गट पुन्हा बांधण्याचे प्रयत्न अजित पवार यांनी सुरू केलेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील कार्यकर्ते मिळूही शकतात. यापूर्वी त्यांनी दुष्काळी फोरम नावाने गट तयार केला होता. सत्ता समीकरणात या गटाचा अपमृत्यू झाला होता. आता सत्तेची, विकासकामांसाठी निधीची आमिषे दाखवली जात आहेत. त्यांच्याबरोबर कोण कोण जाते आणि हा गट कसा आकाराला येतो, ते पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news