

Japanese Baba Vanga Ryo Tatsuki July 5 mega tsunami prediction 2025
ऑनलाईन डेस्क : जपानच्या प्रसिद्ध मांगा कलाकार रियो तात्सुकी यांनी 5 जुलै 2025 रोजी एक मोठी नैसर्गिक आपत्ती होईल अशी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या या भविष्यवाणीनंतर जपानमध्ये आणि आशियातील इतर देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तात्सुकी यांच्या भविष्यवाण्या काही लोकांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या असल्या तरी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना अवैज्ञानिक मानले जाते. तथापि, जपान आणि इतर आशियाई देशांमध्ये नागरिकांना आपत्कालीन तयारीसाठी सजग राहण्याचे महत्त्वाचे आहे.
तात्सुकी यांनी त्यांच्या पुस्तकात 5 जुलै 2025 रोजी जपान आणि आसपासच्या प्रदेशात एक भयंकर त्सुनामी येईल अशी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या त्सुनामी लाटेची उंची 30 मीटरपर्यंत पोहोचू शकते, जी 2011 च्या तोहोकू भूकंप आणि सुनामीपेक्षा तीन पट जास्त विनाशकारी ठरू शकते.
तात्सुकी यांनी त्यांच्या स्वप्नांमध्ये पॅसिफिक महासागरात 'उकळणारे पाणी' आणि ज्वालामुखीचा उद्रेक पाहिला, ज्यामुळे जपानच्या दक्षिणी बेटांपासून तैवान, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि भारताच्या तटीय प्रदेशांपर्यंत त्सुनामीचा धोका निर्माण होऊ शकतो.
रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) या जपानमधील एक मांगा (Manga) कलाकार आहेत, ज्यांनी 1990 च्या दशकात प्रसिद्धी मिळवली होती. त्यांना "जपानी बाबा वेंगा" म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांनी त्यांच्या काही स्वप्नांमधून भविष्यवाणी केली होती, ज्या नंतर खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.
त्यांचे The Future I Saw हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ते पहिल्यांदा 1999 मध्ये प्रकाशित झाले होते नंतर 2021 मध्ये ते नव्याने प्रसिद्ध झाले. त्यांनी त्यांच्या स्वप्नांमध्ये पाहिलेल्या काही घटनांचे चित्रण या पुस्तकात केले आहे. या घटनांपैकी काही खऱ्या ठरल्याचा दावा आहे.
मांगा कला काय आहे ?
मांगा म्हणजे चित्रकथांच्या माध्यमातून सांगितलेली कथा. यात रेखाचित्रे, संवाद (डायलॉग), आणि कथानक (प्लॉट) यांचा संगम असतो. यात तरूण मुलांसाठी शोनन, तरुण मुलींसाठी शोजो, प्रौढ पुरूषांसाठी सेनन, प्रौढ महिलांसाठी जोसेई, लहान मुलांसाठी कोडोमो अशा शैली आहेत.
मांगा आणि अॅनिमे यामध्ये फरक आहे. मांगा हे छापिल किंवा डिजिटल कॉमिक असते. तर अॅनिमे हे टिव्हीवरील अॅनिमेशन आहे. मांगा काळ्या-पांढऱ्या रेषांमध्ये तर अॅनिमे रंगीत असतो.
तात्सुकी यांची इतर काही भविष्यवाण्या देखील अचूक ठरल्याचा दावा केला जातो-
1995 चा कोबे भूकंप
2011 चा तोहोकू भूकंप आणि त्सुनामी
कोविड-19 महारोगराई
या घटनांच्या अचूक भविष्यवाणीमुळे त्यांना 'जपानी बाबा वेंगा' म्हणून ओळखले जाते.
जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीचे प्रमुख रयोइची नोमुरा यांनी या भविष्यवाण्यांना 'फसवणूक' आणि 'अवैज्ञानिक' ठरवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या वैज्ञानिक पद्धतींनी भूकंप किंवा सुनामीच्या वेळ, स्थान किंवा तीव्रतेचा अचूक अंदाज घेणे शक्य नाही. त्यांनी नागरिकांना 'अफवांपासून दूर राहण्य' आणि 'शांत राहण्य'चे आवाहन केले आहे.
तात्सुकी यांच्या भविष्यवाणीनंतर जपानमध्ये पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. दक्षिण कोरिया, तैवान आणि हाँगकाँग येथून जपानकडे जाणाऱ्या फ्लाईट बुकिंग्जमध्ये 50 टक्के ते 83 टक्के घट झाली आहे. अनेक पर्यटकांनी त्यांच्या प्रवासाच्या योजना रद्द केल्या आहेत, ज्यामुळे पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.
बाबा वेंगा (Baba Vanga) म्हणजे एक अंध भविष्यवेत्ती महिला होती असे मानले जाते. बाबा वेंगा या एक रहस्यमय आणि गूढ व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियामधील स्ट्रूमिका (आता उत्तर मॅसेडोनिया) येथे झाला होता.
त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेव्हा गुश्तरव्हानोव्हा (Vangeliya Pandeva Gushterova) होते. त्यांना "बल्गेरियन नॉस्ट्राडॅमस" असेही म्हणतात. त्यांचा मृत्यू 11 ऑगस्ट 1996 रोजी झाला. बालपणातच एका वादळात डोळ्यांमध्ये वाळू गेल्यामुळे त्या अंध झाल्या.
बाबा वेंगाने अनेक भविष्यवाण्या केल्या. त्यामध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन, 9/11 चा हल्ला, 2011 चे जपानमधील भूकंप व त्सुनामी, बराक ओबामा यांचा राष्ट्राध्यक्ष होणं, कोरोना महारोगराई या सांगितल्या जातात.
त्यांचे समर्थक म्हणतात त्यांचं 80 टक्के भविष्य अचूक ठरले. तर संशोधक म्हणतात की, त्यांच्या भविष्यवाण्या अस्पष्ट होत्या. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीतील अनेक दावे मृत्यूनंतर तयार झाले.